वृत्तसंस्था /गंगटोक
सिक्कीम राज्यात तिस्ता नदीला आलेल्या महापुरामुळे हाहाकार उडाला आहे. अचानक आलेल्या या पुरात 14 जणांचा बळी गेला असून किमान 102 लोक बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बुधवारी या राज्याची राजधानी गंगटोकपासून जवळ असणाऱ्या सिंगताम येथे ढगफुटी झाल्याने पूर आला आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये 23 सैनिकांचा समावेश आहे. त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरु करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या संख्येने नागरिक बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत असून हानी नियंत्रणात आणण्यासाठी साहाय्यता दलांनी वेगवान हालचालींना प्रारंभ केला आहे. बुधवारी ढगफुटीचे वृत्त समजताच केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या आधीन असणाऱ्या साहाय्यता संस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन कामाला प्रारंभ केला होता.
ल्होनाक सरोवर फुटले
सिंगताम येथे असणारे सरोवर या ढगफुटीने पाणी वाढल्याने फुटले आहे. या सरोवराला एका बाजूने घातलेला बांध फुटल्याने तिस्ता नदीत पाण्याचा प्रचंड लोट अचानक प्रवेशला. त्यामुळे नदीला प्रचंड पूर आला. परिणामी, नदीकाठी असणारी अनेक घरे वाहून गेली. या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीव आणि वित्तहानी झाली.
सैनिक कसे बेपत्ता झाले?
सिक्कीम हे चीनला लागून असलेले राज्य असल्याने तेथे सीमेवर नेहमीच सैनिक मोठ्या प्रमाणावर नियुक्त असतात. ढगफुटी आणि पूर यामुळे नावांमधून गस्त घालणारे सैनिक वाहून गेल्याचे सांगण्यात आले. तसेच अचानक ढगफुटी आणि त्यापाठोपाठ पूर या संकटांमुळे सैनिक वाहून गेले आहेत, असे स्पष्ट करण्यात आले. सैनिकांचा शोध हेलिकॉप्टर्सच्या साहाय्याने घेतला जात आहे.









