पशुसंगोपनची माहिती : अडचणीत सापडलेल्या पशुपालकांना काहीसा दिलासा
बेळगाव : लम्पी रोगामुळे जिल्ह्यातील पशुपालकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील 6683 नुकसानग्रस्त पशुपालकांना 14 कोटी 95 लाख 25 हजार रुपये मदत देण्यात आली आहे. ही रक्कम डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. शिवाय चालू वर्षात 1372 लाभार्थ्यांना 3 कोटी 5 लाख 95 हजार रुपये मदत जमा करण्यात आली आहे, अशी माहिती पशुसंगोपन खात्याने दिली आहे. गतवर्षी जिल्ह्यात लम्पीने धुमाकूळ घातला होता. दरम्यान 25 हजारहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला होता. यामध्ये दुभत्या जनावरांचादेखील समावेश होता. त्यामुळे पशुपालकांना मोठा फटका बसला. दरम्यान सरकारने मृत झालेल्या बैलासाठी 25 हजार, गायीसाठी 20 हजार तर वासरांसाठी 5 हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पशुपालकांना 18 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या पशुपालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सर्व जनावर मालकांना मदत
महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यात या रोगाचा शिरकाव झाला होता. गतवर्षी या रोगाने मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली होती. दरम्यान पशुसंगोपनने लम्पी प्रतिबंधक लसीकरण केले होते. यंदा देखील या रोगाचा फैलाव वाढला होता. मात्र, तीव्रता कमी असल्याने यंदा मरतुकीचे प्रमाण कमी होते. मात्र, गतवर्षी आणि यंदा लम्पीने दगावलेल्या सर्व जनावर मालकांना सरकारने मदत देऊ केली आहे.
मुख्यमंत्री अमृतयोजना
या योजनेंतर्गत डेअरी युनिट किंवा गायी-म्हशींसाठी 245 लाभार्थ्यांना 39 लाख 83 हजार 440 रुपये अनुदान उपलब्ध झाले आहे. याचे देखील वितरण लाभार्थ्यांना केले जात आहे.
विशेष घटक योजना-आदिवासी योजना
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 49 लाभार्थ्यांना 28 लाख 67 हजार रुपये वाटप केले जात आहेत.
गिरीजन उपयोजना
या योजनेंतर्गत 61 लाभार्थ्यांना 35 लाख 68 हजार 500 रुपये अनुदान मंजूर झाले आहे. या योजनेचेही संबंधित लाभार्थ्यांना वितरण केले जात आहे.









