70 हजार रुपयांमध्ये पदवी देणारी टोळी
वृत्तसंस्था/ सूरत
गुजरात पोलिसांनी सूरत येथे वैद्यकीय शिक्षणाचे बनावट पदवी प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी मागील 32 वर्षांपासून सुशिक्षित बेरोजगारांना 70 हजार रुपयांमध्ये बनावट पदवी प्रमाणपत्र देत होती. तर नोंदणी नुतनीकरणासाठी 5 हजार रुपयांचे शुल्क घेतले जात होते.
बनावट पदवीधारक असलेला एक आरोपी तर केवळ आठवी पास आहे. आरोपींममध्ये बोगस डॉक्टर शमीम अंसारी सामील असून त्याच्या चुकीच्या उपचारांमुळे काही दिवसांपूर्वी एका मुलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत एकूण 13 जणांना अटक करण्यात आली आहे.
टोळीचे 2 मुख्य सूत्रधार डॉ. रमेश गुजराथी आणि बी.के. रावत यांच्याकडून पोलिसांना शेकडो अर्ज आणि प्रमाणपत्रं मिळाली आहेत. या टोळीने आतापर्यंत 1200 हून अधिक जणांना एमबीबीएस अन् वैद्यकीय अभ्यासक्रमांचे बोगस प्रमाणपत्र दिले आहे.
आरोपी डॉ. रमेश गुजराथीने 1990 च्या दशकात बीएचएमएसचे शिक्षण घेतले होते. त्याने 2002 साली गोपीपुरा भागात एक कॉलेज सुरू केले होते. परंतु विद्यार्थ्यांच्या अभावी हे कॉलेज बंद पडले होते. यानंतर त्याने रावतसोबत मिळून बोगस पदवी प्रमाणपत्र विकण्यास सुरुवात केली होती.









