पुणे / वार्ताहर :
पाषाण येथील एक जमीन बांधकाम व्यावसायिकाला विकसनाकरिता देण्यात आली होती. मात्र, विकसनचा करार मोडून या बांधकाम व्यावसायिकाची 14.50 कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी अशोक शिवनारायण थेपडे (वय 74) व अमित अशोक थेपडे (47, दोघे रा. भोसलेनगर, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यवसायिक विजय जगदीशचंद्र अगरवाल (65, रा. पुणे) यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विजय अगरवाल यांनी स्वत: विकसित करण्यासाठी पाषाण येथील एक जमीन 2006 मध्ये घेतली होती. ही जमीन त्यांनी अशोक थेपडे व अमित थेपडे यांचे मे. गॅलक्सी कन्स्ट्रक्शन अँड कॉन्ट्रक्टर प्रा.लि. यांना विकसनासाठी दिली होती. तेथे विकसन करुन 55 टक्के तक्रारदार यांना व 45 टक्के आरोपी यांच्या कंपनीला देण्याचे निश्चित झाले होते. संबंधित बांधकामाचा ताबा 15 महिन्यात देण्याचे ठरले असताना तो आरोपींनी दिला नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी मुदतवाढ देऊनही ताबा दिला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी सन 2016 मध्ये आरोपी यांना नोटीस पाठवली. सर्व हक्क व पॉवर ऑफ ऍटर्नी संपुष्टात आलेली असतानाही आरोपींनी संबंधित हक्क स्वत:कडे आहे, असे खोटे व बनावट कागदपत्र तयार करुन ते खरे असल्याचे भासवले. त्याआधारे त्यांनी सेवा विकास बँक व धरमपेठ महिला मल्टी स्टेट को ऑप सोसायटी यांचेकडून 30 कोटी 75 लाख रुपये कर्ज घेऊन तक्रारदार यांचे हिश्श्याचे 2500 स्के फुटचे दुकान व 10 हजार 500 स्के फुटाचे ऑफीस ज्याची किंमत 14 कोटी 50 लाख रुपये असून सदर मिळकतीचा गैरवापर करुन त्यांची फसवणुक केली. याबाबत पुढील तपास चतुश्रृंगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस टुले करत आहे.









