प्रतिनिधी / कोल्हापूर
शैक्षिणक वर्ष संपत आले तरी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक बदल्यांचा सिलसीला सुरुच आहे. बुधवारी रात्री दहा वाजता 14 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ‘अर्थपूर्ण’ व्यवहरातून या बदल्या केल्याचे समजते. एका बदलीसाठी 50 हजार रुपये उकळल्याच दबक्या आवाजात जिल्हा परिषद वर्तुळात दिवसभर चर्चा होती. विशेष म्हणजे नूतन शिक्षण सभापाती प्रविण यादवही याबाबत अनभिज्ञ आहेत. कोणत्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या हे आपण सांगू शकत नाही असे सांगत शिक्षकबदलीत शिक्षण सभापतीच अंधारात असल्याच्या संतापाला प्रविण यादव यांनी वाट मोकळी करून दिली. दरम्यान यापुढे शिक्षण विभागाचा कुठलाही निर्णय घेताना सभापतींना विचारात घेण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त आहे.
गेले वर्षभर शिक्षण विभागात बदल्यांचे प्रकरण गाजत आहे. न्यायालयाची दारेही शिक्षकांनी ठोठावली होती. तर काही शिक्षकांनी बदलीसाठी चुकीची माहिती ऑनलाईन लॉगीन करून विभागाची फसवणुक केल्याने प्रशासनानेही न्यायालयात गेले होते. दरम्यान सुनावणी घेऊन हा प्रश्न निकाली काढताना मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशानुसार कांही शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्याचे आदेश बुधवारी रात्री काढण्यात आले. शाहूवाडीला शाळा भेटसाठी जाऊन आल्यानंतर रात्री उशीरापर्यंत हे काम पुर्ण करावे लागले अशी माहिती शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी बोलताना दिली.
कारभाऱयांचा ढपला
दरम्यान शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी कारभारी मंडळीनी आदीपासूनच फिल्डींग लावली होती. त्यामुळे बदल्यांचे आदेश झाल्याशिवाय या मंडळीनी जि.प. कार्यालय सोडले नाही. एका शिक्षकाच्या बदलीसाठी पन्नास हजाराचा ढपला पाडल्याने लाखोची कमाई कारभाऱयांनी या बदल्यांमध्ये केल्याची चर्चा जिल्हा परिषद आवारात चांगलीच रंगली. ढपला पाढणारे कारभारी आज दिवसभर जिल्हा परिषदेमध्ये तळ ठोकून असल्याचे समजते.
होय… शिक्षण विभाग दबावाखाली
शिक्षक बदली हा न संपणारा विषय आहे. आमचा विभाग नेहमीच दबावाखाली काम करत आहे. हल्ली कोणत्याही वेळी बदली करावी लागते. रात्री दहा पर्यंत थांबून बदलीच्या आदेशावर सहय़ा केल्या आहेत.
आशा उबाळे,
प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर









