प्रतिनिधी /वाई
वाईच्या वैभवात भर घालणारा 137 वर्षांचा ब्रिटीशकालीन पूल आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पाडण्यास प्रारंभ होत असून तशी नोटीस वाई नगरपरिषदेने काढली आहे. वाहतूकीची पर्यायी व्यवस्थाही पालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. या पुलाच्या आठवणींने वाईकरांच्या एका डोळयात आसू आहेत तर नवीन पुलाची उत्सुकताही आहे. कित्येक दशके या पुलाने वाईकरांना आपल्या खांद्यावरून पुरातून वाचवत सुखरूप इच्छीतस्थळी पोहचविले आहे. यामुळे सोशल मिडीयावर आज हा पूल बोलका होताना दिसत आहे.
ब्रिटीशांनी 137 वर्षापूर्वी बांधलेला कृष्णा पूल आजपर्यंत वाईच्या वैभवात भर टाकीत आला आहे. या पुलाची आयुमर्यादा संपल्याने तसा अहवाल ब्रिटीशांनी पाठविला होता. परंतू अजूनही हा पूल मजबूत स्थितीत असल्याचे बोलले जाते. परंतू दिवसेंदिवस वाहतूकीच्या संख्येत होणारी वाढ पाहता नवीन पुलाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मंजूरी मिळाल्यानंतर सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्याने आज या पुलाचा शेवटचा दिवस ठरला आहे. पालिकेच्यावतीने तशी सूचना नागरिकांना देण्यात आली असून. आज सकाळपासून पूल पाडण्याचा कामास प्रारंभ करण्यात येणार आहे. पालिकेच्यावतीने पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. महागणपती मंदिराच्या पश्चिम बाजूकउs नदी पात्रातून घोटवडेकर हॉस्पिटल ते गुरेबाजार मार्ग, सोनगिरवाडी व्यायामशाळा ते धोंडीविनायक मंदिर पुलावरून रविवारपेठे स्थानभूमी रस्ता दुचाकी मार्ग तर महागणपती पुल शिवाजी चौक ते चित्रा टॉकीज किसनवीर चौक मार्ग, एमआयडीसी रस्ता, शहाबाग फाटा व भद्रेश्वर पुल मार्ग अशी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
गेली चौदा दशके या पुलाचे व वाईकरांचे रुणानुबंध जुळले आहेत. कित्येक पिढया या पुलाने पाहिल्या आहेत. अनेक महापूर, या पुरात पोहणारे युवक व पुलावरून असणारी नेहमीची वर्दळीचा तसेच वाईच्या सामाजिक, सांस्कृतीक जडणघडणीचा साक्षीदार असलेला हा पुल. हा पूल पाडण्यात येणार असल्याचे समजल्यापासूनच सोशल मिडीयावरून अनेकजण व्यक्त होताना दिसत आहेत. तरे अनेकजण सेल्फी काढत हा चिरंतण ठेवा आपल्या मोबाईलमध्ये कैद करीत आहेत. आजही अनेक तरुण वयोवृघ्द लोक या पुलावर दोन मिनीट थांबून सेल्फी काढताना दिसत होते. वाईकरांच्या मनात या पुलाने आपले स्थान बनविल्याचेच दिसून येत होते.
भाजपा व काँग्रेस पक्षाच्यावतीने हा पूल न पाडता दुसरीकडे नवीन पुल बांधावा अशी निवेदणेही देण्यात आली असली तरी आता त्याला काहीच अर्थ नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पुलाच्या या पुर्वसंध्येला अनेकांनी भावणावष होत या पुलाचा आज अखेरचा निरोप दिला.









