सौरभ मुजुमदार,कोल्हापूर
Ganesh Utsav 2023 : कोणत्याही पाषाण शिल्पातील अथवा कोणत्याही धातूची नसलेली किंवा कोणत्याही मोठ्या मंदिरातही प्रतिष्ठापना न झालेली परंतु गेली 136 वर्षांहून अधिक काळापूर्वीची सुंदर गणेश मूर्ती आजही कोल्हापूरमध्ये आहे.सध्या वयाची साठी पूर्ण झालेल्या ज्येष्ठांच्या नजरेसमोर ती मूर्ती येणार,हे मात्र नक्की.डोईवर किरीट नाही,परंतु कुरळ्या केसांचा, मधोमध भांग असणारा,डावा पाय सिंहासनावर,उजवा पाय खाली सोडलेला,एक हात सिंहासनावर टेकलेला तर दुसरा गुडघ्यावर घेऊन हसरा चेहरा असणारा असा हा शिवाजी पेठेतील सरदेसाईंचा चंद्राकांत गणेश होय.
ज्येष्ठ अभ्यासक,पत्रकार सुनीलकुमार सरनाईक यांनी या गणेश मुर्तीबाबत तरुण भारत संवादला फारच रंजक माहिती दिली.ते म्हणाले, कोकणातील रत्नागिरी जिह्यातील मावळंगचे वासुदेव वामन सरदेसाइ पत्नी लक्ष्मीबाईसह कोल्हापुरात आले.गणपतीसाठी कोकणात गावी जाण्यापेक्षा घरातच गणपतीची प्रतिष्ठापना करावी,या उद्देशाने त्यांनी मुंबईचे प्रसिद्ध मूर्तिकार कै. बेंद्रे यांच्या कारागिराकडूनच ही मूर्ती इ.स.1887 ला तयार करून घेतली.शिवाजी पेठेत निवृत्ती चौकातून उभा मारुती मंदिराकडे जाताना दौलतराव भोसले विद्यालय शाळेसमोर या सरदेसाईंचा वाडा होता. ज्याच्या दर्शनी भागाला लाकडी फळयांचे दरवाजे होते.ही मूर्ती बाहेरून येता- जाता सहजपणे दिसायची.
गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत ही मूर्ती सर्वांना दर्शनासाठी खुली असायची.अन्यत्र कोठेही अशी मूर्ती कदाचित नसावी,कारण ती कागदाच्या लगद्यापासून बनवली होती. गणपतीसमोर काचेच्या रंगीबेरंगी हंड्या लटकवलेल्या असत.ही एकच मूर्ती एकाच ठिकाणी उभे राहून सभोवती मांडलेल्या 21 आरशांमध्ये 21 प्रतिमांमध्ये दिसायची. ज्यामुळे 21 गणपतींचे दर्शन घेतल्याची श्रद्धा त्यावेळी लाखो भक्तांची होती.बेल्जियमच्या या हंड्या व आरशांची मांडणीही मुंबईच्या खास अभियंत्यांकडून केली गेली होती, असे समजते.गणेश मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धींच्या रेखीव मूर्तीही असायच्या.
बिनखांबी गणेश मंदिरामागे कोठी शाळेसमोरील बोळात दुधगावकरांचा वाडा.आजही तो आहे. याच वाड्यातील कै.स.ब. कुलकर्णी दुधगावकर वैद्य यांच्याकडून या गणेशाची विधीवत पूजाअर्चा होत असे.या मूर्तीला वस्त्रही तेच नेसवत.कालांतराने सरदेसाई कुटुंबियांनी कोल्हापूरचे निवासस्थान सोडताना ती मूर्ती शिवाजी तरुण मंडळाकडे सुपूर्द केली होती.पुढे बरीच वर्षे ती तेथेच होती.
आजही बऱ्याच ज्येष्ठांकडून या चंद्राकांत गणेशा विषयी अनेक गोष्टी कानी पडतात.काहीं जण तर या गणेश मूर्तीविषयी श्रद्धेने विचारपूस व चौकशीही करतात.सध्या गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले.कोट्यावधींची उलाढाल मोठ्या श्रद्धेने हौसेपोटी होऊ लागली आहे.परंतु आजही अनेक कोल्हापूरकरांच्या हृदयात श्रद्धेचे घर करून विराजमान झालेला चंद्राकांत गणेश कोणीही हटवू शकलेला नाही.
चला चंद्राकांत गणेशच्या दर्शनाला
सध्या हीच गणेश मूर्ती लोकमान्य हॉल,एकजुटी मंडळ,मोहिते पार्क,क्रशर चौक येथे प्रतिष्ठापित केलेली आहे.तोच राजेशाही बैठा थाट,तेच तेज,तीच भक्ती ज्यामध्ये काहीच कमी नाही.चंद्राकांत गणेशाचे रोज तसेच दर संकष्टीला विधिवत पूजन होते. मोहन धर्माधिकारी ही व्यवस्था इंगळीकर जोशी व निखील मंगेशकर यांच्या पौरोहित्याखाली पार पाडतात.वासुदेव सरदेसाई यांचे नातू रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथून निवृत्त झालेले अजितराव सरदेसाई वर्षातून एकदा तरी आपल्या लाडक्या गणरायाच्या दर्शनास येऊन जातात.
सर्वात जुनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती
इसवी सन 1886 साली कागदाच्या लगद्यापासून बनवलेली ही गणेशमूर्ती साडेसहा फूट उंच तर अंदाजे 50 किलोची आहे.कदाचित देशातील पहिलाच असा हा पर्यावरण पूरक गणपती कोल्हापुरात असावा,असे अभ्यासकांना वाटते.