कचरा विल्हेवारीसंबंधीच्या करारावर स्वाक्षरी
बेळगाव : केंद्रीय विकासमंत्री मनोहरलाल यांच्या उपस्थितीत जयपूर (राजस्थान) येथे नुकत्याच झालेल्या मेळाव्यामध्ये बेळगाव शहर कचरा विल्हेवारीसंबंधीच्या करारावर स्वाक्षरी झाली. याद्वारे बेळगाव शहराला 135 कोटींचे अनुदान मंजूर झाले आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेसंबंधी ण्घ्ऊघ्घ्ए 2.0 आवाहन करण्यात आल्यानुसार देशभरातून 84 शहरांनी भाग घेतला होता. बेळगाव स्मार्ट सिटी व महानगरपालिका बेळगाव यांच्या संयुक्त सहकार्याने प्रस्ताव तयार करून मांडण्यात आला होता. बेळगाव स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापक संचालक सईदा अफ्रीनबानू बळ्ळारी यांनी योजना प्रस्ताव सादर केला होता. अंतिमत: CITIIS2.0 अंतर्गत 18 शहरांची निवड झाली.
त्यामध्ये बेळगाव शहराचा समावेश असून शहराच्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. बेळगाव स्मार्ट सिटीमार्फत शहरातील घनकचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी आदर्श रुपरेषा तयार करण्यात आली आहे. योजना कार्यरुपात आणण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यासाठी 135 कोटी रुपये अनुदान उपलब्ध झाले आहे. मार्च 2028 ला योजनेचा कालावधी संपणार आहे. करारावर स्वाक्षरीप्रसंगी केंद्रीय व्यवहार खात्याच्या रूपा मिश्रा, कर्नाटक मूलभूत सुविधा-वित्तसंस्था बेंगळूर कार्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक शरत, बेळगाव स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापक संचालक बळ्ळारी, महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.









