दापोली :
समुद्री कासवांची अर्थात ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची दापोली किनाऱ्यांवर यावर्षी १३ हजार ४९४ अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. यावर्षी दाभोळ, कोळथरे येथे सर्वाधिक घरटी संरक्षित झाल्याचे कांदळवन विभागाकडून समोर आले आहे. या कासवांच्या जन्मोत्सवाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
दाभोळ येथे ६५ घरटी मिळाली असून यात ६,२८१ अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. कोळयरे येथे ३० घरटी सापडली असून यात २,९६४ अंडी संरक्षित झाली आहेत. तर मुरुड येथील एका घरट्यात १३५, लाडघर येथील ३ घरट्यांमध्ये २९६, आंजर्ले येथील ११ घरट्यांमध्ये १,३११, कर्दे येथील ७ घरट्यांमध्ये ७७१, तर केळशी येथे १७ घरट्यांमध्ये १,७३६ अंडी अशी एकूण १३४ घरट्यांमध्ये १३,४९४ अंडी सापडली आहेत
- कासवमित्रांची मदत
ही अंडी कांदळवन विभागामार्फत कासवमित्रांच्या मदतीने संरक्षित करण्यात आली आहेत. ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांनी अंडी दिल्यानंतर ४५ ते ५५ दिवसांनी पिल्ले बाहेर येतात. दापोलीत संरक्षित करण्यात आलेल्या अंड्यांमधून येत्या काही दिवसातच पिल्ले बाहेर येण्याचा अंदाज कांदळवन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.








