पर्यटकांना जाण्यास मज्जाव
जगात अशा अनेक अजब जागा आहेत, ज्याबद्दल लोकांना फारच कमी माहिती आहे. याचमुळे ही ठिकाणे जगासाठी गूढ ठरतात. असेच एक चर्चे अनेक वर्षांपासून 130 फूट उंच खडकावर उभे आहे, पण ते कशाप्रकारे तयार करण्यात आले हे कुणीच जाणत नाहीत. याला ‘जगातील सर्वात एकाकी चर्च’ मानले जाते.
जॉर्जियामधील कटशफी पिलर अत्यंत प्रसिद्ध आहे. हा 130 फूट उंचीचा स्तंभाच्या आकारातील खडक असून त्यावर कित्येक वर्षे जुना चर्च आहे. स्तंभासारख्या दिसणाऱया खडकावर चर्चची निर्मिती कशाप्रकारे करण्यात आली हे कुणीच जाणत नाही. चुनादगडांनी तयार हा खडक अत्यंत मजबूत आहे. हा चर्च 10-20 वर्षे नव्हे तर 1200 वर्षांपेक्षाही अधिक जुना असल्याचे जाणकारांचे मानणे आहे.
तेथील मान्यतांनुसार या खडकाला पिलर ऑफ लाइफ म्हटले जाते. 1944 मध्ये एलेक्झेंडर जॅपरिड्स नावाचा गिर्यारोहक आणि त्याचे पथक पहिल्यांदाच या खडकावर चढले होते. तेव्हा त्यांना तेथे दोन चर्च आढळून आले होते. हे चर्च पाचव्या किंवा सहाव्या शतकातील असल्याचे त्यांचे मानणे होते.
त्या काळात ख्रिश्चन धर्माचे संत जगापासून दूर शांततेच्या शोधात बाहेर पडायचे असे मानले जाते. याचमुळे या चर्चमध्ये असेच प्रीस्ट रहात असावेत. तर हा चर्च 9 व्या किंवा 10 व्या शतकातील असल्याचा दावा अलिकडेच काही अध्ययनांनी केला आहे.
1990 च्या दशकात चर्चमधील धार्मिक विधी पुन्हा सुरू करण्यात आले. तर 2005 मध्ये मॉनेस्ट्रीन पूर्णपणे तयार झाली. फादर मॅक्सिमे क्वाटरडजे मागील 20 वर्षांपासून देवाच्या शोधात या चर्चमध्ये राहत आहेत. आठवडयातील 2 दिवस ते चर्चमध्ये नसतात. या चर्चमध्ये केवळ संत आणि प्रीस्टच जाऊ शकतात. पर्यटकांच्या जाण्यावर तेथे बंदी आहे. तसेही या चर्चपर्यंत पोहोचणे अत्यंत अवघड आहे. या खडकापर्यंत जाण्यासाठी पायी प्रवास करावा लागतो आणि त्यानंतर शिडीवरून चढून जावे लागते.