क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युवा सबलीकरण व क्रीडा विभाग यांच्या मान्यतेनुसार बेळगाव जिल्हा तायक्वांदो संघटना आयोजित पंचांची कार्यशाळा व उजळणी मोठय़ा उत्साहात पार पडली.
चिकोडी येथे घेण्यात आलेल्या या पंच कार्यशाळा व उजळणीचे आयोजन करण्यात आले. यात 21 प्रशिक्षकांनी भाग घेतला होता. या कार्यशाळेत खेळ व्यवस्थापन, आत्मसंरक्षण, इलेक्ट्रॉनिक स्टोअरिंग सिस्टीम व विश्व तायक्वांदोच्या नवीन नियमांची माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत त्रिवेणी बदकण्णावर, श्रेया अतिवाडकर, जितेश पुजारी, श्रीराम पाटील, अक्षय मालगे, वीरकुमार सुदगडे, गौरव शिंदे, सुजल शिरोळे, निशांत गायकवाड, विजय बेडगे, हर्ष कुकण्णहळ्ळी, वज्रकुमार सुदगडे, संदीप धामण्णावर यांनी पंच परीक्षेत भाग घेतला होता. यांना पंच परीक्षेतील लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिके यात 70 टक्केहून अधिक गुण मिळविणे आवश्यक होते. त्यानुसार त्यांनी 70 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना बेळगाव जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय पंच ऍड. प्रभाकर शेडबाळे, महादेव मुतनाळे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून भारतीय वायू सेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक श्रीपाद रवीराव यांनी काम पाहिले. राजाराम पाटील व वैभव पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.









