बागमती नदीत दुर्घटना; 33 प्रवाशांपैकी 20 जणांना वाचविले
वृत्तसंस्था /मुझफ्फरपूर
बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये बागमती नदीत विद्यार्थ्यांनी भरलेली बोट बुडाली. अपघातसमयी बोटीमध्ये सुमारे 33 विद्यार्थी होते. त्यापैकी 20 जणांना वाचविण्यात यश आले असून 13 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी सायंकाळपर्यंत प्रयत्न सुरू होते. बेपत्ता झालेले सर्व गायघाट ब्लॉकमधील मधुरपट्टी गावचे रहिवासी आहेत. बेपत्ता झालेल्या मुलांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यातील बहुतांश मुले इयत्ता 9वी आणि 10वीचे विद्यार्थी आहेत.
गायघाट पोलीस ठाण्याच्या बेनियाबाद ओपीच्या बागमती नदीवरील मधुरपट्टी घाटाजवळ ही घटना घडली. गुऊवारी सकाळी गायघाट ब्लॉकमधील बलौर हायस्कूलमध्ये काही मुले बोटीने जात होती. बोटीत काही मुले आणि महिला व पुऊषही होते. दोरीच्या साहाय्याने बोट एका किनाऱ्यावरून दुसऱ्या बाजूला नेली जात असताना दोर तुटल्यामुळे बोट कलंडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या घटनेनंतर बोटीतील प्रवाशांनी पाण्यात पडल्यानंतर आरडाओरड सुरू करताच 20 हून अधिक मुलांना नदीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, तर 13 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती सुरुवातीला देण्यात आली. बोटीत किती मुले आणि लोक होते याची नेमकी माहिती घेण्याचे प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून दिवसभर सुरू होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत या घटनेवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना केल्या. तसेच पीडित कुटुंबाला सरकारकडून योग्य ती नुकसानभरपाई दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.









