पुणे : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आणि ओंकार बाणखेले खून प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी संतोष जाधव याच्या टोळीतील सात जणांना व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून 13 गावठी पिस्तुले, आठ मोबाईल, एक बुलेट कॅरियर, एक मॅक्झीन आणि चारचाकी जप्त करण्यात आली आहे. कुख्यात बिष्णोई टोळीशी संबंधित संतोष जाधवने यापैकी दोन आरोपींना मध्य प्रदेशातील मनवर येथे गावठी पिस्तुलांचा साठा आणण्यासाठी पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
जीवनसिंग दर्शनसिंग नहार (वय 23, रा. मंचर), श्रीराम रमेश थोरात (वय 32, रा. मंचर), जयेश रतिलाल बहिराम (वय 24, रा. घोडेगाव), वैभव उर्फ भोला शांताराम तिटकारे (वय 19, रा. जळकेवाडी, चिखली), रोहित विठ्ठल तिटकारे (वय 24, रा. सरेवाडी, नायफड), सचिन बबन तिटकारे (वय 22, रा. धबेवाडी, नायफड), जिशान इलाइबक्श मुंढे (वय 20, रा. घोडेगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. संतोष जाधवसह या आरोपींविरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका विधी संघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत नारायणगावमधील इंदिरानगर येथील वॉटर प्लांट व्यावसायिकाने तक्रार दिली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
संतोष जाधव याने पाच ते सहा महिन्यांपूर्वी या व्यावसायिकाला व्हॉट्सअपवर कॉल करून पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. मात्र, व्यावसायिकाने घाबरून कोठेही तक्रार दिली नव्हती. त्यानंतर 24 मे रोजी संतोषने पुन्हा एकदा व्यावसायिकाकडे खंडणी मागितली, तसेच एका साथीदाराला व्यावसायिकाच्या वॉटर प्लांटवर पाठवून, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, संतोष जाधवला अटक झाल्यानंतर या व्यावसायिकाने नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी संतोष जाधवकडे चौकशी केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नहार आणि थोरातला अटक केली. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांकडे केलेल्या तपासात, संतोष जाधव याने जयेश बहिराम व एकाला मध्य प्रदेशातील मनवर येथे गावठी पिस्तुलांचा साठा आणण्यासाठी पाठविले होते, अशी माहिती समोर आली. गावठी पिस्तुले आणल्यानंतर संतोष जाधवच्या सांगण्यानुसार नहार, थोरात व विधी संघर्षित बालकाला खंडणीची रक्कम आणण्यासाठी पाठवायचा कट सर्व आरोपींनी रचला होता. त्याप्रमाणे या आरोपींनी व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींच्या घरझडतीतून शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. संतोष जाधवने किंवा त्याच्या नावाने कोणी खंडणी मागितली असल्यास, जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.









