रशियाकडून जवळपास 300 ड्रोनद्वारे गोळीबार
वृत्तसंस्था/ कीव
रशियाने युक्रेनची राजधानी कीव आणि देशाच्या इतर प्रदेशांवर सलग दुसऱ्या रात्री ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी मोठे हल्ले केले. या हल्ल्यात किमान 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी दिली. रशियाने युक्रेनवर एकूण 367 ड्रोन आणि क्षेपणास्त्रs डागली, असे युक्रेनियन हवाई दलाचे प्रवक्ते युरी इग्नाट यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ चाललेल्या युद्धातील हा सर्वात मोठा हल्ला होता. युक्रेनने 266 ड्रोन आणि 45 क्षेपणास्त्रs नष्ट करण्यात यश मिळवले. तरीही कीव व्यतिरिक्त खार्किव, मायकोलाईव आणि टर्नोपिल सारख्या इतर अनेक शहरांचेही नुकसान झाले.
रशियाने विविध प्रकारच्या 69 क्षेपणास्त्रांचा आणि 298 ड्रोनचा वापर केला. यामध्ये इराणी डिझाइन केलेल्या शाहिद ड्रोनचा समावेश आहे. 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनमधील हा सर्वात मोठा हवाई हल्ला असल्याचे इग्नाट यांनी सांगितले. रशियन क्षेपणास्त्रs आणि ड्रोनने 30 हून अधिक युक्रेनियन शहरे आणि गावांवर हल्ला केल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनीही स्पष्ट केले आहे. रशियाच्या हल्ल्यांमध्ये 60 हून अधिक जण जखमी झाल्याचे युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लिमेन्को यांनी सांगितले. तसेच 13 जण मृत्यूमुखी पडल्याच्या वृत्तालाही त्यांनी दुजोरा दिला.









