उत्तर प्रदेशातील शाहजहानपूरमधील दुर्घटना : ओव्हरटेक करण्याच्या धडपडीतून घात
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथील तिल्हार निगोही रोडवरील पुलावरून शनिवारी ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातप्रसंगी ट्रॉलीमध्ये 30 ते 35 जण होते. पुलावरून ट्रॅक्टर-ट्रॉली रेलिंग तोडून नदीत पडली. घटनेची माहिती समजताच स्थानिक नागरिकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
सनौरा गावातील लोक गावातील भागवत कथेसाठी पाणी आणण्यासाठी जात होते. अजमतपूर गावात होणाऱ्या भागवत कथेसाठी दोन ट्रॅक्टर-ट्रॉली आणि डीसीएममधून निघाले असता दोन्ही ट्रॅक्टर-ट्रॉली एकमेकांना ओव्हरटेक करू लागल्या. याचदरम्यान एक ट्रॅक्टर-ट्रॉली पुलाचे रेलिंग तोडून सुमारे 40 फूट खाली कोसळली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
या अपघातात 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. जखमींना जवळच्या ऊग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना जिल्हा ऊग्णालयात पाठवण्यात आले. आहे. मृतांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचे एसपी एस आनंद यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून शोकभावना
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या आत्म्यांना शांती लाभो, अशी मनोकामना करत मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना तात्काळ ऊग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख आणि जखमींना 50 हजारांची भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.









