14 जण जखमी, मृतांमध्ये महिला-मुलांचा समावेश
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये रविवारी रात्री उशिरा एक भीषण रस्ता अपघात घडला. या दुर्घटनेत ट्रेलर आणि मिनी ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत 13 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. सर्वजण एका कौटुंबिक कार्यक्रमातून परतत होते. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
एका समारंभातून परतत असताना मिनी ट्रक आणि ट्रेलर यांची धडक झाली.
अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व लोक खारोरा येथील बाणा गावातून रायपूरकडे परतत होते. छठी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर हे सर्वजण एका मिनी ट्रकमधून प्रवास करत होते. ते बांगोनी गावाजवळ पोहोचताच झारखंडहून येणाऱ्या ट्रेलरने त्यांना जोरदार धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की मिनी ट्रकचा चेंदामेंदा झाला. टक्कर झाल्यानंतर अनेक लोकांच्या मृतदेहांचे तुकडे झाले. काही महिला आणि मुले जागीच मृत्युमुखी पडली.
या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 3 मुले आणि 10 महिलांचा समावेश आहे. तसेच 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर रायपूरमधील मेकरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
मिनी ट्रक ट्रेलरच्या दोन्ही बाजूंनी सुमारे 3 फूट पसरलेल्या जड लोखंडी भागांशी (यंत्रसामग्रीचे भाग) आदळला. टोल टाळण्यासाठी ट्रेलर चालकाने आपले वाहन बाजूच्या छुप्या मार्गाने वळविल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच सदर ट्रेलरमध्ये असलेल्या यंत्रसामुग्रीचा जवळपास 3 फूट लांबीचा भाग बाहेर आल्याचे निदर्शनास आले आहे. ट्रेलरशी धडकल्यानंतर मिनी ट्रक नियंत्रणाबाहेर गेला आणि मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकला धडकला.









