इस्रायल-हमास शस्त्रसंधीला प्रारंभ : इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाची माहिती
वृत्तसंस्था / जेरुसलेम
एका दिवसाने लांबलेल्या इस्रायल-हमास शस्त्रसंधीला शुक्रवारी प्रारंभ झाला आहे. त्यामुळे युद्धाचा प्रारंभ झाल्यापासून शुक्रवारी प्रथमच गाझा पट्टीत तुलनात्मक शांतता दिसून येत आहे. या शस्त्रसंधी करारानुसार हमास इस्रायलच्या 50 ओलिसांची सुटका करणार आहे. तर इस्रायलकडून 150 हमास कैद्यांची सुटका केली जाणार आहे. पहिल्या दिवशी 13 ओलिसांची सुटका करण्यात आल्याची घोषणा शुक्रवारी सायंकाळी इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली. ओलिसांच्या सुटकेनंतर आता इस्रायल 39 कैदी सोडणार असून त्यालाही प्रारंभ होईल. हमासकडून सुटका करण्यात आलेल्या ओलीसांमध्ये थायलंडच्या 12 नागरिकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
शस्त्रसंधीचा प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत इस्रायलची सेना आणि हमास यांच्यात कोणताही संघर्ष झाल्याचे दिसून येत नाही, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे गाझा पट्टीत या करारानुसार प्रतिदिन 1 लाख 30 हजार लिटर डिझेल आणि मानवता साहाय्याचे 200 ट्रक सोडले जाणार आहेत. ही शस्त्रसंधी चार दिवसांची आहे. त्यानंतर पुन्हा ओलीस सोडण्याची तयारी हमासने दाखविल्यास शस्त्रसंधीचा कालावधी वाढविला जाऊ शकतो. दहशतवाद्यांकडून शस्त्रसंधीचा भंग झाल्यास मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असे तज्ञांचे मत आहे.
चार इंधन टँकर दाखल
शस्त्रसंधीला प्रारंभ झाल्यानंतर काही तासातच गाझा पट्टीत इंधनाचे चार टँकर्स दाखल झाल्याचे सांगण्यात आले आहे. अन्न आणि औषधे घेऊन काही ट्रक्सही गाझात येण्याच्या मार्गावर आहेत. मानवीय सहाय्यता शनिवारपासून अधिक मोठ्या प्रमाणात आणण्यात येईल, अशी शक्यता आहे. तथापि, चार दिवसांनंतर काय होणार, यासंबंधी आजही साशंकता असून पुन्हा युद्धाला प्रारंभ होईल, अशी शक्यताही व्यक्त होत आहे. सध्यातरी ही शस्त्रसंधी डळमळीत असल्याचे मत आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. यासंबंधी आणखी 24 तासांमध्ये चित्र अधिक स्पष्ट होईल, अशी स्थिती असल्याचे समजते.
उत्तरेत परतण्याचा प्रयत्न
शस्त्रसंधी झाल्यानंतर दक्षिणेतील शेकडो पॅलेस्टाईनींनी उत्तरेत येण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, इस्रायली सैनिकांनी गोळीबार केल्याने त्यांचे परतणे थांबले असल्याची माहिती देण्यात आली. इस्रायली सैन्याच्या गोळीबारात 2 पॅलेस्टाईनी नागरिक ठार झाले असून 11 जखमी झाले आहेत. जखमींना दक्षिण गाझा पट्टीतील रुग्णालयांमध्ये दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
इस्रायलकडून नागरिकांना इशारा
इस्रायलच्या आदेशावरुन गाझा पट्टीतील जे नागरिक उत्तर भागातून दक्षिण भागात गेलेले आहेत, त्यांनी शस्त्रसंधीचा लाभ उठवून पुन्हा उत्तर गाझात परतण्याचा प्रयत्न करु नये. कारण तेथे इस्रायलची सेना असून तिची कारवाई रोखण्यात आलेली नाही, असा इशारा देणारी पत्रके इस्रायलने गाझा पट्टीच्या दक्षिण भागात विमानातून टाकलेली आहेत. गुरुवारी ही पत्रके टाकण्यात आली. युद्ध अद्याप संपलेले नसून ते हमास आणि इतर दहशतवादी संघटनांचा नाश झाल्यानंतरच संपणार आहे, असेही इस्रायलने स्पष्ट केले आहे.









