वार्ताहर / वेतवडे
महाराष्ट्र पोलीस दलातील खात्यांतर्गत परीक्षा उतीर्ण झालेल्या 119 कर्मचारी तब्बल 13 वर्षे पोलीस उपनिरीक्षक पदोन्नतीच्या प्रतिक्षेत आहेत. 2006 ते 2013 कालावधीत महाराष्ट्र राज्यसेवा आयोगातर्फे पोलीस खात्यांतर्गत घेतलेल्या परीक्षांमध्ये हे सर्व जण उतीर्ण झाले होते. मात्र अद्याप उपनिरीक्षक म्हणून घेण्यात आले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुंबईसह महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गत परीक्षांमधून उपनिरीक्षक म्हणून रुजू होण्याची संधी असते. त्याप्रकारे विविध कालावधीत कर्मचारी उपनिरीक्षक म्हणून सेवेत दाखल झाले आहेत. मात्र 2006 ते 2013 दरम्यान खात्यांतर्गत झालेल्या परीक्षांत यशस्वी झालेल्या 119 कर्मचाऱ्यांना अद्यापही ती संधी देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे 2016 मध्ये याच पध्दतीने परीक्षात यशस्वी ठरलेल्या 154 उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना संपूर्ण पोलीस दल त्याविरोधात उभे राहिले आहे. लॉकडाऊन पासुन नियम शिथिल झाल्यानंतरही अहोरात्र झटणाऱ्या दलात उपनिरीक्षक हे पद महत्त्वाचे आहे.या पदांवरील अधिकाऱ्यांवर कामाचा मोठ्या प्रमाणावर ताण येत असतो. त्यामुळे प्रतिक्षेत असलेल्यांना उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली असती तर सेवेतील अधिकाऱ्यांचा ताफा आणखी चांगल्या पद्धतीने उपयोगात आला असता असेही मत नोंदवले जात आहे. ही सर्व प्रक्रिया अनेक वर्षे रखडली असून त्यांना पदोन्नती केंव्हा देणार अशीही विचारणा विधिमंडळ अधिवेशनात वेळोवेळी केली होती. त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते पण त्याचा आता त्यांना विसर पडल्याची खंत उतीर्ण झालेल्यांना वाटत आहे.
2006 साली खात्यांतर्गत काम सांभाळत अभ्यास करून उपनिरीक्षक ही परीक्षा पास झालो होतो पण आज कित्येक वर्षे उलटली तरीही आम्हाला न्याय मिळालेला नाही. आताच्या सरकारने तरी याकडे लक्ष देऊन आम्हाला पदोन्नती द्यावी ही विनंती आहे. सरदार पाटील [ पोलीस ] – कळे पोलीस ठाणे कळे ता.पन्हाळा
Previous Articleअज्ञात चोरट्यांकडून रोख रकमेसह २५ हजारांचा ऐवज लंपास
Next Article 5 जी नेटवर्क प्रवासात ऍपलचा होणार समावेश








