चिपळूण :
शहरातील डीबीजे महाविद्यालयातून इयत्ता बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी तालुक्यातील सती येथे उघडकीस आली. ती कुटुंबियांसमवेत सती येथे वास्तव्यास होती. याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, नेमक्या कोणत्या कारणातून ही आत्महत्या केली असावी, याचे कारण पुढे आलेले नसून याबाबतचा पोलीस तपास करत आहेत.
अंजिली रवींद्र निशाद (18, सती, मूळ–उत्तरप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. चिपळूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजिली ही शहरातील डीबीजे महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये होती. निशाद कुटुंब हे मूळचे उत्तरप्रदेश येथील असून ते काही वर्षांपासून सती येथे भाड्याने राहत आहेत. अंजिलीने नुकतीच संपलेली बारावीची परीक्षा दिली होती. असे असताना तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर याची माहिती चिपळूण पोलीस ठाण्यास देण्यात आली. त्यानुसार घटनास्थळी पोलीस दाखल झाले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश महाडिक करत आहेत.








