अकरावीत नापास झालेले 157 विद्यार्थीही परीक्षा देणार
प्रतिनिधी / पणजी
सोमवारपासून सुरू होणाऱ्या शालान्त मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला अकरावीत नापास झालेले 157 विद्यार्थी यंदा थेट बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. यंदा हा आकडा सर्वाधिक असल्याची माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्यो यांनी दिली.
शालान्त मंडळाच्या बारावी परीक्षेला 17718 विद्यार्थी राज्यातील विविध 20 केंद्रांमधून परीक्षा देणार आहेत. शालान्त मंडळाच्या संकेतस्थळावर आसन व्यवस्था व आसन क्रमांक देण्यात आलेला आहे. 10 फेब्रुवारी ते 1 मार्च या काळात परीक्षा होणार असून सकाळी 9.30 वाजता परीक्षेस सुरूवात होणार आहे.
विद्यार्थ्यांनी 45 मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक असल्याचे मंडळाने कळविले आहे. गेल्या वर्षी 17511 विद्यार्थ्यांची बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. यंदा 17718 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. गत वर्षापेक्षा यंदा 207 विद्यार्थी जास्त आहेत. तसेच यंदा विद्यार्थ्यांपेक्षा (मुलगे) विद्यार्थीनींचा आकडा जास्त आहे. परीक्षेला 8477 विद्यार्थी तर 9241 विद्यार्थीनी बसणार आहेत.
शाखांचा विचार केला तर विज्ञान शाखेत सर्वाधिक 6095 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कला शाखेत 4076, वाणिज्य शाखेत 5092 तर व्यावसायिक शाखेत 2455 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सर्व विषय घेउन 36 विद्यार्थी (रीपीटर) पुन्हा परीक्षा देणार आहेत. काही विषय घेउन परीक्षा (रीपीटर) देण्राया विद्यार्थ्यांचा आकडा 828 आहे. पूर्वीच्या निकालात सुधारणा करण्याच्या उद्देशाने 17 विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत, असेही भागीरथ शेट्यो यांनी सांगितले.









