9 मार्चपासून परीक्षेला प्रारंभ : परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर
बेळगाव ; बारावीच्या परीक्षा 9 ते 29 मार्चदरम्यान पदवीपूर्व विभागाकडून घेतल्या जाणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी 42 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. परीक्षा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने विद्यार्थी तसेच पालकांची धाकधूक वाढली आहे. परीक्षेचे काऊंटडाऊन सुरू असून, विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करीत आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 25 हजार 390 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. एकूण 42 केंद्रांवर परीक्षा होणार असून सीसीटीव्हीसह भरारी पथकांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. 21 हजार 465 फ्रेशर्स असून, 2 हजार 820 रिपीटर्स, 1 हजार 105 बहिस्थ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गुरुवारपासून परीक्षा सुरू होणार असल्याने बारावीचे विद्यार्थी परीक्षेच्या अभ्यासात गर्क आहेत.
पेपरफुटी महाराष्ट्रात, खबरदारी कर्नाटकात
सध्या महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा सुरू असून, यापैकी 2 पेपरफुटीच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना हे पेपर पुन्हा देण्याची परिस्थिती ओढवली आहे. महाराष्ट्रात पेपर फुटला असला तरी 3 दिवसांनी कर्नाटकातील बारावीच्या परीक्षा सुरू होणार असल्यामुळे विशेष खबरदारी घेतली जात आहे. पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आतापासूनच कठोर निर्बंध घातले जात आहेत.
पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक
- दिनांक विषय
- 9 मार्च प्रथम भाषा
- 11 मार्च गणित
- 13 मार्च अर्थशास्त्र
- 14 मार्च हिंदुस्थानी संगीत, मानसशास्त्र, रसायनशास्त्र
- 15 मार्च द्वितीय भाषा
- 16 मार्च बिझनेस स्टडिज
- 17 मार्च ऑटोमोबाईल, आयटी
- 18 मार्च भूमिती, जीवशास्त्र
- 20 मार्च इतिहास, भौतिक शास्त्र
- 21 मार्च हिंदी
- 23 मार्च इंग्रजी
- 25 मार्च राज्यशास्त्र, संख्याशास्त्र
- 27 मार्च अकौंटन्सी, जिओलॉजी
- 29 मार्च समाजशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स









