पणजी : विविध कारणामुळे राज्यात वाहन अपघातांची संख्या वाढली आहे. अपघातातील मृत्यूंच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गेल्या चार महिन्या एकूण 982 अपघात झाले. त्यात 127 जणांचा वाहन अपघातात मृत्यू झाला आहे. 2022 सालातील याच काळात 1 हजार 27 अपघात झाले होते तर 80 जणांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वाहन अपघातातील मृत्यूंची संख्या वाढली असून सर्व साधारणपणे दर दिवसाला एक ते दोन व्यक्तींचा वाहन अपघातात मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. वाहन अपघातात मृत्यू झालेल्यामध्ये अधिकाधिक 30 वर्षाच्या खालील युवकांचा समावेश असून ही एक चिंतेची बाब आहे. वाहत अपघातात मृत्यू झालेल्या मध्ये दुचाकी चालक 80, दुचाकीवरील सहप्रवासी 17, चालक 8, पादचारी 14, प्रवासी 3, सायकल चालक 2 तर अन्य 3 जणांचा समावेश आहे. 2022 सालात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात 1027 वाहन अपघात झाले असून त्यात दुचाकी चालक 49, दुचाकीवरील सहप्रवासी 12, चालक 1, पादचारी 14, प्रवासी 2, सायकल चालक 0 अन्य 2 यांचा समावेश आहे.
दुचाकीवरील सहप्रवाशालाही हेल्मेट सक्तीचे
वाहन अपघातांची एकूण संख्या पाहिल्यास दुचाकीना जास्त अपघात होत असल्याचे दिसून येते. अपघातातील मृत्यूच्या संख्येवर आळा घालण्यासाठी दुचाकी चालकांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र दुचाकीवरील सह प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुचाकीवरील सहप्रवाशाला आता हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे.
मोटार वाहन कायद्याचे कलम 194 डी लवकरच
दुचाकीवरील सहप्रवाशाने हेल्मेट न वापरल्यास दुचाकीस्वाराला चलन देण्यात येणार असल्याचे वाहतूक अधइकाऱ्यांनी सांगितले आहे. गोवा वाहतूक पोलिस लवकरच दुचाकीवरील सहप्रवाशाने हेल्मेट न वापरल्यास चलन जारी करणार आहेत. अपघातात दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायद्याचे कलम 194 डी लवकरच राज्यात समान रीतीने लागू केले जाईल असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.









