खेड :
गेल्या तीन दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील जगबुडी नदीपात्रासह नारिगी नदीपात्रातील गाळ उपसा प्रक्रियेला अखेर ‘ब्रेक’ लागला. जगबुडी नदीपात्रात ४ मार्चपासून सुरू झालेली गाळ उपसा प्रक्रिया १४ जूनला थांबली. १०१ दिवसात १२,५४९ ब्रास म्हणजेच ३५.५१४ घनमीटर गाळ उपसण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. पाऊस संपेपर्यंत गाळ उपसा प्रक्रिया बंद राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
गतवर्षी मे अखेरीस गाळ उपसण्याची प्रक्रिया हाती घेतली होती. त्यानंतर ६ महिने रखडलेली गाळ उपसा प्रक्रिया ४ मार्चपासून पुन्हा हाती घेण्यात आल्याने व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. अलोरेतील जलसंपदा विभागाने २ पोकलेन मशिनद्वारे गाळ उपसण्याच्या प्रक्रियेला वेग दिला होता. नाम फाऊंडेशनही नारंगी नदीपात्रातील गाळ उपसा करण्यात गुंतली होती.
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, नातूनगर पाटबंधारे उपविभागीय अधिकारी सत्यजीत गोसावी, कनिष्ठ अभियंता हेमंत ढवण, बळवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा विभागाच्या यंत्रणेकडून गाळ उपसण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असतानाच २५ ते ३० मे दरम्यान पडलेल्या धो-धो पावसामुळे प्रक्रियेत खोडा पडला होता. यानंतर १ ते १३ जून या कालावधीत पुन्हा गाळ उपसण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर हाती घेण्यात आली.
१३ दिवसात ५०० ब्रास म्हणजेच १४१५ घनमीटर गाळ उपसा करण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे गाळ उपसा प्रक्रियेला ‘ब्रेक’ लावावा लागला. जगबुडी नदीपात्रातून तब्बल ३५५१४ घनमीटर गाळ उपसा करण्यात यश आल्याने पाणी पातळीच्या खोलीत वाढ झाल्याने पुराची टांगती तलवार दूर होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे.
नारंगी नदीपात्रातूनही ३१६८ ब्रास म्हणजेच ८९६५ घनमीटर गाळ उपसा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पाऊस संपेपर्यंत गाळ उपसा प्रक्रिया बंद राहणार आहे. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा गाळ उपसा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.








