सजावटीसाठी झेंडूच्या फुलांचा वापर अधिक : फूल बाजार तेजीत : फुलांची कोट्यावधींची उलाढाल : झेंडूच्या फुलांना अच्छे दिन
बेळगाव : लक्ष्मी पूजनासाठी रविवारी अशोकनगर येथील फूल बाजारात तब्बल 125 टन फुलांची आवक झाली. दरम्यान, बाजार विविध फुलांनी बहरला होता. विशेषत: झेंडूच्या फुलांना मागणी अधिक होती. मागील दोन दिवसांत तब्बल 160 टन फुलांची आवक झाली आहे. तर 1 कोटी 38 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या झेंडू, शेवंती, गुलाब आदी आकर्षक फुलांनी ग्राहकांचे लक्ष वेधले. दिवाळी सणासाठी झेंडूच्या फुलांना अधिक मागणी असते. दिवाळी पर्वाला गुरुवारी वसुबारसपासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे झेंडूची फुले दाखल होऊ लागली आहेत. रविवारी लक्ष्मी पूजनानिमित्त मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची विक्री झाली. फूल बाजारात झेंडू 80 ते 100 रुपये किलो, शेवंती 25 ते 35 रुपये किलो, अॅस्टर 110 रुपये किलो यांसह मोगरा, जुई, अबोली आदी फुलांची विक्री वाढली होती.
दिवाळीत धनत्रयोदशीपासून लक्ष्मीपूजन तसेच पाडव्यानिमित्त पूजेसाठी फुलांना मोठी मागणी असते. विशेषत: झेंडू आणि शेवंतीच्या फुलांना अधिक पसंती दिली जाते. एरवी 20 रुपये किलो मिळणारी झेंडूची फुले रविवारी 80 ते 100 रुपये किलो झाली होती. त्यामुळे नागरिकांना जादा पैसे मोजावे लागले. हार, तोरण आणि इतर सजावटीसाठी झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे व्यावसायिक आणि दुकानदारांकडून रविवारी झेंडूच्या फुलांची खरेदी करण्यात आली. शहर परिसरात रविवारी लक्ष्मीपूजन धूमधडाक्यात साजरे करण्यात आले. त्यामुळे पूजेसह घराला तोरण बांधणे, सजावट, वाहनांना आणि इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी झेंडूच्या फुलांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. विशेषत: किरकोळ बाजारात झेंडूच्या फुलांची आवक वाढली होती.
विविध ठिकाणी विक्री
लक्ष्मीपूजनासाठी रविवारी शहरातील विविध भागात झेंडूच्या फुलांची विक्री करण्यात आली. समादेवी गल्ली, काकतीवेस रोड, नरगुंदकर भावे चौक, खडेबाजार, बसस्टँड रोड यांसह इतर ठिकाणी फुलांची विक्री झाली. त्यामुळे दिवाळीत झेंडूच्या फुलांना अच्छे दिन आल्याचे दिसत आहे.
1.38 कोटीची उलाढाल
दिवाळीसाठी फूल बाजारात फुलांची आवक वाढू लागली आहे. विशेषत: झेंडू आणि शेवंतीच्या फुलांना मागणी अधिक आहे. मागील दोन दिवसांत 160 टन फुलांची आवक झाली. रविवारी 125 टन फुलांची आवक झाली. यामधून 1 कोटी 38 लाख रुपयांची उलाढाल झाली.
– महांतेश मुरगोड, सहसंचालक, बागायत खाते









