वृत्तसंस्था/ टोरांटो
कॅनडाच्या सर्वात मोठ्या टोरांटो आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकतीच चोरीची मोठी घटना घडली. येथील विमानतळावरून तब्बल 121 कोटींचे सोने व मौल्यवान वस्तूंची चोरी झाली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यामागे मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांना आहे. ही टोळी कॅनडातील आहे की अन्य ठिकाणची यासंबंधी काहीच माहिती देण्यात आलेली नाही. तपास पूर्ण होईपर्यंत हा माल कोणत्या कंपनीचा होता, तसेच तो कोणत्या विमान कंपनीकडून आणला गेला आणि त्याचे वजन किती हे सांगता येणार नसल्याचे तपास अधिकारी ड्युस्टन यांनी सांगितले.
टोरांटो विमानतळावर 17 एप्रिल रोजी संध्याकाळी उशिरा एक विशेष कंटेनर दाखल झाला होता. त्यात 14.8 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 121 कोटी रुपये किमतीचे सोने आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या. ते सुरक्षितपणे कंटेनर सुविधेत हलविण्यात आले होते. त्यानंतर 20 एप्रिल रोजी संपूर्ण माल चोरीला गेल्याचे आढळून आले. ही घटना उघड झाल्यापासून कॅनडाचे पोलीस संबंधितांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.









