चितगावमध्ये पूर्ण हॉटेल बुक : रजिस्टरमध्ये नामोल्लेख नाही
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात शेख हसीना सरकारचे पतन झाल्यावर अमेरिकेचा या देशासोबतचा सैन्यसंपर्क वाढला आहे. याचदरम्यान अमेरिकेच्या सैन्याचे समुरो 120 अधिकारी चितगाव येथे पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व अधिकारी यूएस-बांगलादेश एअरलाइन्सच्या विमानाने ढाक्यातून चितगाव येथे दाखल झाले असून रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसाठी या हॉटेलमध्ये पूर्वीच 85 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. अमेरिकेच्या सैन्याधिकाऱ्यांच्या या दौऱ्याबद्दल मोठी गुप्तता बाळगण्यात आली आहे.
हॉटेलमधील रजिस्टमध्ये कुठल्याही अधिकाऱ्याचे नाव नोंद नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर 14 सप्टेंबर रोजी चितगाव येथील विमानतळावर इजिप्तच्या वायुदलाचे एक विमान उतरले होते, यानंतर 15 सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या सैनिकांनी बांगलादेशच्या वायुदलाच्या पटेंगा वायुतळाचा दौरा केला होता. काही दिवसांपूर्वी ढाका येथे एका अमेरिकच्या विशेष अधिकाऱ्याचा मृतदेह सापडला होता. 50 वर्षीय टेरेन्स अर्वेले जॅक्सन असे या मृत अधिकाऱ्याचे नाव होते. त्याच्या मृत्यूला संशयास्पद मानले जात आहे. बांगलादेशचे सैन्य स्वत:च्या क्षेत्रात अमेरिकेच्या सैनिकांच्या उपस्थितीवरून सतर्क राहिले आहे.









