प. बंगालमधील हिंसेची पार्श्वभूमी : 2018 मध्ये होते 34 टक्के प्रमाण : हिंसा झालेल्या ठिकाणी पक्षाला मिळाले बिनविरोध यश
वृत्तसंस्था /कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये 8 जुलै रोजी स्थानिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी राज्यातील सत्तारुढ पक्षाला (तृणमूल काँग्रेस) एकप्रकारे झटका बसल्याचे म्हणावे लागेल. स्थानिक निवडणुकीत तृणमूलचे 12 टक्के उमेदवारच बिनविरोध निवडून आले आहेत. तर 2018 च्या निवडणुकीत पक्षाचे 34 टक्के उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. या आकडेवारीतून मागील 5 वर्षांमध्ये स्थानिक निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला बिनविरोधात स्वरुपात मिळणाऱ्या जागांच्या संख्येत 22 टक्क्यांची घट झाल्याचे स्पष्ट होते. तृणमूल काँग्रेसला यंदा बिनविरोध म्हणून जिंकता आलेल्या जागा या प्रामुख्याने उमेदवारी प्रक्रियेवेळी मोठ्या प्रमाणात हिंसा झालेल्या ठिकाणच्या आहेत. यात बीरभूमसोबत मुर्शिदाबाद, बांकुडा आणि दक्षिण 24 परगणा जिल्हा सामील आहे.
बिनविरोधसाठी हिंसेचा आधार
राज्यातील बदलत्या समीकरणांना राजकीय तज्ञ 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरवत आहेत. बंगालमध्ये ‘सत्तेचा मार्ग गावांमधूनच जातो’ अशा आशयाची एक म्हण आहे. तर तृणमूल काँग्रेसने हिंसेचा आधार घेतला नसता तर त्याच्या उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याचे प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा अधिक राहिले नसते असा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायतींच्या 73,887 जागांपैकी 9,013 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता या जागांकरता 8 जुलै रोजी मतदान होणार आहे. हे प्रमाण एकूण जागांच्या सुमारे 12 टक्के इतके आहे.
हिंसा अन् बिनविरोधचे गणित
2018 मध्ये तृणमूल काँग्रेसने बीरभूम जिल्ह्dयातील 90 टक्के जागा बिनविरोध जिंकल्या होत्या. तेव्हा पक्षाचे बाहुबली नेते अनुव्रत मंडल यांचे समांतर सरकार चालायचे असे बोलले जायचे. परंतु मंडल आता पशुतस्करीप्रकरणी मागील दोन वर्षांपासून दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैद आहेत. याचमुळे यावेळी जिल्ह्यातील केवळ 30 टक्के जागांवर तृणमूलचे उमेदवार बिनविरोध जिंकले आहेत. परंतु तरीही हे प्रमाण उर्वरित जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे.
उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखले
आमच्या पक्षाच्या उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले, अन्यथा बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या निम्म्यावर आली असती असा दावा भाजप प्रवक्ते शमीक भट्टाचार्य यांनी केला आहे. तर माकप नेते सुजन चक्रवर्ती यांनीही तृणमूल काँग्रेसवर अशाच प्रकारचा आरोप केला आहे. तृणमूल काँग्रेसने हिंसा घडवून आणत तसेच अन्य पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अनेक ठिकाणी स्वत:चे उमेदवार बिनविरोध निवडून आणल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
2018 पेक्षा वेगळे चित्र
बंगालमधील भाजपचे 63 तर काँग्रेसचे 40 आणि माकपचे 36 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर 8,874 जागांवर तृणमूलचे उमेदवार बिनविरोध जिंकले आहेत. हे चित्र 2018 च्या निवडणुकीपेक्षा एकदम वेगळे आहे. तेव्हा 58,692 पैकी 20,078 म्हणजेच 34.2 टक्के जागांवर बिनविरोध निर्णय लागला होता, यातील जवळपास सर्व जागा तृणमूलने जिंकल्या होत्या.









