इटलीत 12 पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक
युरोपमार्गे इस्रायलमध्ये जाण्याचा होता प्रयत्न ः दहशतवादी हल्ल्याचा कट
वृत्तसंस्था/ रोम
पाकिस्तानी कट्टरवादी युरोपमार्गे इस्रायलमध्ये घुसण्याचा कट रचत आहेत. इटलीच्या गुप्तचर यंत्रणांनी याचा खुलासा केला आहे. इटलीच्या जेनेआ या शहरातून 12 पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांची गुप्त ठिकाणी चौकशी करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेले सर्व दहशतवादी अवैध मार्गाने युरोपमध्ये पोहोचले होते. हे सर्व दहशतवादी एकाच गटाचे आहेत. ‘गब्बर’ असे या गटाचे नाव आहे.
पाकिस्तान आणि इस्रायल यांच्यात अधिकृत संबंध नाहीत. पाकिस्तानचे पासपोर्टधारक इस्रायलचा प्रवास करू शकत नाहीत. सौदी अरेबियाने देखील आतापर्यंत इस्रायलला मान्यता दिलेली नाही. परंतु बॅकडोअर डिप्लोमसी अंतर्गत दोन्ही देशांमध्ये संबंध निर्माण झाले आहेत.
इटली आणि युरोपला इशारा
पाकिस्तानातील कट्टरवादी वेगवेगळय़ा युरोपीय देशांमध्ये अवैध मार्गाने घुसत आहेत. यातील काही जण इस्रायलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रकार युरोप आणि इस्रायलसाठी धोक्याचा आहे. अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे दहशतवादी गटांशी संबंध आहेत. हे दहशतवादी युरोपमध्ये देखील हल्ला घडवून आणण्याचा कट रचत होता. अटकेची माहिती समोर येताच युरोपीय महासंघातील देश सतर्क झाले आहेत.
शार्ली हेब्दोशी कनेक्शन
पॅरिसमध्ये 2020 मध्ये शार्ली हेब्दो नियतकालिकाच्या कार्यालयावर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या चौकशीदरम्यान पाकिस्तानी कनेक्शन समोर आले होते. युरोपमध्ये कट्टरवाद्यांची संख्या वाढविण्यात पाकिस्तानचा मोठा हात असल्याचे मानले जाते. युरोपच्या तपास यंत्रणा दोन वर्षांपासून दहशतवादी आणि कट्टरवादी संघटनांच्या विरोधात मोहीम राबवत आहेत. पाकिस्तानी नागरिक इटलीच्या अनेक प्रांतांमध्ये सक्रीय आहेत.
पाकिस्तानी नागरिकांवर नजर
ब्रिटन, स्पेन, इटली, फ्रान्स आणि जर्मनीसह अनेक युरोपीय देश स्वतःच्या देशात राहणाऱया पाकिस्तानी नागरिकांवर नजर ठेवत आहेत. पॅरिसमध्ये 2020 मध्ये दोन नागरिकांवर चाकूने हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या चौकशीदरम्यान जहीर हसन महमूदला अटक करण्यात आली होती. जहीर हा पाकिस्तानी नागरिक होता. इम्रान खान सरकारच्या काळात ‘तहरीक-ए-लब्बैक’ सारख्या कट्टरवादी संघटनांना सरकारकडून समर्थन मिळाल्याने धोका अनेक पटींनी वाढल्याचे युरोपयी देशांचे मानणे आहे. या संघटनेने फ्रान्सच्या राजदूताची देशातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. फ्रान्सने 4 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली होती. हे सर्व जण दावत-ए-इस्लामी या संघटनेचे सदस्य होते.









