वृत्तसंस्था /भुवनेश्वर
ओडिशातील बेरहमपूर नजीकच्या दिगापहंडी येथे दोन बस समोरासमोर एकमेकींवर आदळून झालेल्या भीषण अपघातात 12 प्रवासी ठार झाले. दोन बसपैकी एक राज्य सरकारची प्रवासी बस होती तर दुसरी विवाह आटोपून परतीचा प्रवास करणाऱ्यांची होती. या अपघातात सात प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती देण्यात आली. तसेच वऱ्हाडी लोकांना घेऊन जाणाऱ्या बसची मोठी हानी झाली. मात्र, राज्य सरकारच्या प्रवासी बसवर विशेष परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. या बसमधींल प्रवाशांपैकी काहीजण किरकोळ जखमी झाले. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या अपघातासंदर्भात तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच अपघातातील प्रत्येक मृतामागे 3 लाख रुपयाची भरपाई घोषित केली आहे. जखमींवर उपचार सुरु असून प्रत्येक जखमीला 30 हजार रुपयांच्या भरपाईचीही घोषणा मुख्यमंत्री पटनाईक यांच्याकडून करण्यात आली.









