मतपेट्या लुटण्याबरोबरच तोडफोडीमुळे निवडणूक प्रक्रियेला गालबोट
► वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये प्रचंड हिंसाचारामध्ये शनिवारी पंचायत निवडणुकीचे मतदान पार पडले. राज्यभरात ठिकठिकाणी हिंसाचार, जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या. शनिवारी सकाळी 7 वाजता पंचायत निवडणुकीला सुऊवात झाल्यापासून दुपारपर्यंत राज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. तर, मध्यरात्री झालेल्या मतदानाशी संबंधित हिंसाचारात अन्य तिघांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा एकूण आकडा 12 वर पोहोचला आहे. मृतांमध्ये सहा टीएमसी आणि भाजप-काँग्रेसच्या प्रत्येकी एका कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय अन्य पक्षाच्या समर्थकांचाही हिंसाचारात मृत्यू झाला आहे. हिंसाचाराबरोबरच मतदान बूथ ताब्यात घेण्यापासून मतदान केंद्राची तोडफोड करत एकमेकांवर बंदुकी रोखण्यापर्यंतच्या घटनाही दिवसभरात घडल्या आहेत.
वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिंसाचारामुळे राज्यभर तणावाचे वातावरण आहे. राज्यात पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दल तैनात असूनही प्रचंड हिंसाचार झाला आहे. पूर्व मेदिनीपूरच्या नंदीग्राम ब्लॉक 1 च्या रहिवाशांनी टीएमसीवर बूथ पॅप्चरिंगचा आरोप करत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. महमदपूरच्या बूथ क्रमांक 67 आणि 68 मध्ये केंद्रीय फौजफाटा तैनात करण्यात यावा, असे लोकांचे म्हणणे आहे.
मुर्शिदाबादमधील बेलडांगा येथे काँग्रेस आणि तृणमूल यांच्यात झालेल्या संघर्षात सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता बाबर अली ठार झाला. तर बंदुकीची गोळी लागल्याने अन्य एक काँग्रेस कार्यकर्ता ऊग्णालयात दाखल आहे. कूचबिहारमध्येही परिस्थिती बिकट असून मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आली. मतदान सुरू होताच मतपत्रिका लुटण्यात आल्या आहेत. मालदा येथील माणिकचक आणि गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात जोरदार गोळीबार झाला आहे. यामध्ये शेख मलेक नामक एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. हुगळीत टीएमसी कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारावर गोळ्या झाडल्याचे सांगण्यात आले.
मतदान बूथवर थयथयाट
बंगालमध्ये अनेक बूथवर झालेल्या हिंसक संघर्षात अनेक जण जखमी झाले आहेत. मतदान साहित्याची तोडफोड, खुर्च्या-टेबल्सची नासधूस याशिवाय राज्यातील अनेक भागात मतपेट्या फोडल्याच्या घटनाही घडल्या. एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कथितरित्या मतपेटी घेऊन पळताना दिसत आहे. तर एका तलावात मतपेटी तरंगत असल्याचा प्रकारही उघड झाला आहे. कडक सुरक्षा असतानाही हे प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हिंसक घटनांचे व्हिडीओ व्हायरल
पश्चिम बंगालमधील त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीत परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. शनिवारी जाहीर झालेल्या निवडणुकीदरम्यान हिंसाचार, बूथ पॅप्चरिंगपासून ते बंदुकी रोखण्यापर्यंतचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हिंसाचार आणि गुंडांचा मतपेटी घेऊन पळ काढतानाचा व्हिडीओ भाजपने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. व्हिडीओ आणि छायाचित्रे शेअर करताना भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून राज्यात मोठे उपद्व्याप सुरू असल्याचे नमूद केले आहे. या रक्तपाताला राज्य निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
पश्चिम बंगालमधील या हिंसाचाराच्या घटनांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. भाजपने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. याचदरम्यान, निवडणूक हिंसाचारात सहा समर्थक गमावलेल्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) विरोधकांवर हिंसाचार भडकवल्याचा आरोप केला आणि मतदारांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल केंद्रीय दलांवर टीका केली.
राष्ट्रपती राजवटीची भाजपची मागणी
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी केली. राज्य प्रशासनाच्या अंतर्गत मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका म्हणजे मृगजळ आहे. राष्ट्रपती राजवट किंवा कलम 355 अंतर्गत निवडणुका घेणे आवश्यक आहे. राज्यघटनेच्या कलम 355 नुसार राज्यांमधील अंतर्गत गोंधळ आणि बाह्या आक्रमणापासून संरक्षण करणे हे केंद्राचे कर्तव्य ठरते.









