जखमींची प्रकृती धोक्याबाहेर : बसचालकाविरुद्ध एफआयआर
बेळगाव : परिवहन मंडळाची भरधाव बस रस्त्याशेजारील झाडावर आदळून बसमधील बाराहून अधिक प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी सकाळी 7 च्या सुमारास कल्लेहोळजवळ ही घटना घडली. काकती पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. बसचालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गणेशपूरहून बेळगुंदीकडे जाताना बसचे स्टेअरिंग तुटून बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. सर्व जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मालू खोरागडे, सत्तार गौस, कावेरी, छाया डावाळे, पूजा कांबळे, पूनम पाटील, संगीता खोरागडे, रामलिंग पाटील, मयूर पाटील, तन्वी सावंत, बसवराज मुर्कीभावी, केंपण्णा पाटील अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत. ते बेळगाव व खानापूर परिसरातील राहणारे आहेत. काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.









