केक फॅक्टरीमध्ये बेकायदेशीरपणे काम : व्हिसा उल्लंघनाचाही आरोप
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमध्ये एका महिलेसह 12 भारतीयांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण गाद्या आणि केकच्या कारखान्यात बेकायदेशीरपणे काम करत होते. त्यांच्यावर व्हिसाच्या अटींचे उल्लंघन केल्याचाही आरोप असल्याचे ब्रिटिश इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. ब्रिटनच्या गृह कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, इमिग्रेशन अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी इंग्लंडमधील वेस्ट मिडलँड्स भागातील मॅटेस व्यवसायाशी संबंधित युनिटवर छापा टाकला. याठिकाणी बेकायदेशीर काम होत असल्याची गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती.
7 भारतीयांना गादी तयार करणाऱ्या कारखान्यातून अटक करण्यात आली. तसेच नजिकच असलेल्या केक कारखान्यातून 4 जणांना पकडले. या चौघांवरही व्हिसाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. याशिवाय इमिग्रेशन गुन्ह्याच्या आरोपाखाली एका भारतीय महिलेलाही अटक करण्यात आली आहे. कारवाईनंतर अटक केलेल्या लोकांना भारतात परत पाठवले जाऊ शकते. कारवाई पूर्ण होईपर्यंत या लोकांना कोठडीत ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर संबंधित कारखान्यात बेकायदेशीर कामगारांना कामावर ठेवल्याचा आरोप सिद्ध झाल्यास आणि काम देण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची परिपूर्ण चौकशी न केल्यामुळे दोन्ही कारखान्यांवर दंडात्मक कारवाईही होणार आहे.









