वार्ताहर /किणये
सुवर्णविधानसौधजवळील खमकारट्टी शिवारात टाकलेले अन्न खाल्ल्यामुळे 12 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मेंढपाळ हतबल झाला आहे. मृत्युमुखी पडलेली बकरी कोंडुसकोप गावातील शेतकऱ्यांची असून अन्य पाच बकऱ्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याची माहिती गावातील शेतकऱ्यांनी दिली आहे.
सुनील देमपण्णवर यांची पाच बकरी तर निंगप्पा देमपण्णवर या शेतकऱ्यांची सात बकरी दगावली आहेत. यामुळे गावातील शेतकरी भयभीत झाले आहेत. त्यांच्या उर्वरित बकऱ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. सुवर्ण विधानसौधजवळील खमकारट्टी शिवाराजवळ शनिवारी सदर कोंडुसकोप गावातील देमपण्णवर या शेतकऱ्यांनी आपली बकरी चरण्यासाठी सोडली होती. यावेळी सुवर्णविधानसौधजवळ काही मोर्चेकरी थांबले होते. त्यांनी मोर्चा काढून शिल्लक राहिलेले अन्न त्याच ठिकाणी टाकले होते. हे टाकाऊ शिळे अन्न सदर बकऱ्यांनी खाल्ले.
यामुळे घरी गेल्यानंतर रविवारी सायंकाळी यातील नऊ बकरी दगावली तर सोमवारी दुपारी तीन बकरी मृत्युमुखी पडली आहेत. रविवारी सायंकाळी बकऱ्यांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. के. के. कोप्प येथील पशुखात्याचे अधिकारी कोंडुसकोप गावात दाखल झाले. त्यांनी या बकऱ्यांवर शर्थीचे उपाय सुरू ठेवले आहेत.
कळपातील 12 बकऱ्यांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे देमपण्णवर यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक विकासकामे करण्यासाठी त्यासंदर्भात चर्चा या अधिवेशनात करण्यात येतात. मात्र अधिवेशन सुरू असताना अधिवेशनासाठी येणारी वाहने, नागरिक हे आजूबाजूच्या शेतशिवारामध्ये जात आहेत. त्यामुळे शिवारातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. याकडे अधिकारी लक्ष कधी देणार? आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार कोण करणार, अशी चर्चाही शेतकरी करू लागले आहेत.









