पुणे / वार्ताहर :
खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, विनयभंग, दरोडयाची तयारी, दंगा, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, साथीचे रोग पसरविण्याचा प्रयत्न, मालमत्तेचे नुकसान करणे, फौजदारीपात्र कट रचणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, जुगार अशाप्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील 12 गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 व 56 नुसार पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिह्यातून तडीपार करण्याचे आदेश मंगळवारी देण्यात आले.
तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे सुरज ताजमोहंमद सिद्दकी (वय 20, रा. गुलटेकडी, पुणे), सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील विवेक बाबुराव चोरगे (23, रा. बालाजीनगर, पुणे), धीरज रंगनाथ आरडे (25, रा. पदमावती, पुणे), गणेश सुनील मोरे (26, रा. धनकवडी, पुणे), किरण वामन जगताप (25, रा. पदमावती, पुणे) या आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे तानाजी राजाभाऊ जाधव (38, रा. संतोषनगर, कात्रज), प्रदीप राम जाधव (29, रा. जांभुळवाडी, कात्रज), गणेश विजय भंडलकर (21, रा. कात्रज) यांच्यावर बडगा उचलण्यात आला आहे. तर, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील आदित्य ऊर्फ दिनेश युवराज ओव्हाळ (22, रा. कोरेगाव पार्क, पुणे), सागर कल्याण माने (30, रा. कोरेगाव पार्क, पुणे) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लष्कर पोलीस ठाण्याचे हद्दीत आरबाज हसन कुरेशी (वय 23, रा. जाफरीन लेन, पुणे) व बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहन मल्लेश तुपधर (23, रा. ताडीवाला रोड, पुणे) यांच्यावर तडीपार कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढील काळात देखील रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर अशाचप्रकारची ठोस प्रतिबंधक कारवाई करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.