राज्य निवडणूक आयोगाची घोषणा : विजापूर नगरपरिषदेचाही समावेश
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील 12 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. वेळापत्रकानुसार 8 एप्रिल 2021 रोजी अधिसूचना जारी होणार आहे. तर 15 एप्रिल अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. तर 27 रोजी मतदान तर एप्रिल 30 रोजी मतमोजणी होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी सायंकाळी पत्रक जारी करून 7 नगरपालिका, 3 नगरपरिषद आणि 2 नगर पंचायतींसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. संविधानाच्या परिच्छेद 243 झेड ए नुसार असणारे अधिकार आणि कर्नाटक पालिका अधिनियम 1964 च्या अनुच्छेद 17 नुसार आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे.
दोड्डबळ्ळापूर नगरपालिकेच्या 31 वार्डांसाठी, रामनगर 23, चन्नपट्टण 31, शिरा 31, भद्रावती 35, महिकेरी 23 व बिदर नगरपालिकेच्या 35 वॉर्डांसाठी मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे विजापूर, बेलूर आणि तरिकेरे नगरपरिषदेच्या प्रत्येकी 23 जागांसाठी देखील 27 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ातील गुडीबंडे नगर पंचायतीच्या 11 आणि शिमोगा जिल्हय़ातील तीर्थहळ्ळी नगरपंचायतीच्या 15 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
बळ्ळारी महापालिकेची निवडणूकही जाहीर
बळ्ळारी महानगरपालिकेसाठी देखील राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी निवडणूक वेळापत्रक जाहीर केले आहे. बळ्ळारी महापालिकेच्या 39 वॉर्डांसाठी देखील 27 एप्रिल रोजी मतदान होणार असून 30 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.









