टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिरियाची हेन्ड झाझा ही अवघ्या 12 वर्षांची ऍथलिट यंदा सर्वात तरुण स्पर्धक ठरली असून याचवेळी ऑस्ट्रेलियन 66 वर्षांच्या मेरी हॅना या सर्वात वयस्कर ऑलिम्पियन ठरल्या आहेत.
सिरियाची 12 वर्षांची ऑलिम्पियन झाझा ही टोकियोत टेबल टेनिसमध्ये आपले नशीब आजमावणार आहे. ऑलिम्पिक्समधील सर्वात तरुण ऍथलिटचा 1968 मधील विक्रम मात्र यानंतरही अबाधित राहिला आहे. 1896 ऍथेन्स ऑलिम्पिकमध्ये 10 वर्षीय जिम्नॅस्ट दिमित्रोसने सांघिक गटात कांस्य जिंकले आणि तीच आजवरची सर्वात तरुण ऑलिम्पियन ठरली आहे. यापूर्वी 1968 हिवाळी ऑलिम्पिकमध्ये 11 वर्षीय स्केटर बिट्राईस हुस्तियू ही सर्वात तरुण टेबल टेनिस ऑलिम्पियन ठरली होती.

दरम्यान, 66 वर्षीय ऑस्ट्रेलियन ऍथलिट मेरी हॅना यंदा टोकियो ऑलिम्पिकमधील सर्वात वयस्कर प्रतिस्पर्धी ठरल्या आहेत. हॅनासाठी यंदाचे सातवे ऑलिम्पिक असून त्या घोडदौडीतील ड्रेसेज इव्हेंटमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. 1996 ऍटलांटा स्पर्धेत त्यांनी ऑलिम्पिक पदार्पण नोंदवले होते. ऑलिम्पिक इतिहासात सर्वात वयस्कर ऍथलिट म्हणून स्वीडनच्या ऑस्कर स्वॅन यांची नोंद आहे. ऑस्कर स्वॅन यांनी 1920 बेल्जियम ऑलिम्पिकमध्ये नशीब आजमावले, त्यावेळी त्यांचे वय 72 वर्षे होते.
जॉर्जियाच्या निनो सॅल्यूवेझसाठी चक्क नववी ऑलिम्पिक!
जॉर्जियाच्या 52 वर्षीय ऍथलिट निनो सॅल्यूक्वेझ यंदा आपल्या देदीप्यमान कारकिर्दीत चक्क नवव्यांदा ऑलिम्पिक प्रतिनिधीत्व नोंदवत आहेत. सॅल्यूक्वेझने आतापर्यंत सहभागी झालेल्या 8 ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य अशी तिन्ही पदके जिंकली आहेत. त्यांनी 1988 सेऊल ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम भाग घेतला होता. 2016 मध्ये तर सॅल्यूक्वेझ व त्यांचा चिरंजीव त्सोत्ने मॅशवारियनी या आई-मुलाने जॉर्जियाचे प्रतिनिधित्व केले होते.
सर्वाधिक ऑलिम्पिक सहभागाचा विक्रम कॅनडाचे इक्वेस्ट्रियन इयान मिलर यांच्या खात्यावर नोंद असून त्यांनी 1972 ते 2012 या कालावधीत 10 ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे.









