ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवुडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचा लहान भाऊ एहसान खान यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी बुधवारी रात्री 11 वाजता अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीपकुमार यांचा दुसरा भाऊ अस्लम खान यांचाही अवघ्या बारा दिवसांपूर्वी (21 ऑगस्ट) मृत्यू झाला होता. 16 ऑगस्ट रोजी दोघांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
लीलावती रुग्णालयातील डॉ. जलील पारकर यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून एहसान खान यांची प्रकृती चिंताजनक होती. कोरोना संसर्गाप्रमाणेच त्यांच्यावर हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि अल्झायमर यासारख्या आजारांवर उपचार सुरू होते.

दिलीप साब यांचे धाकटे भाऊ एहसान खान यांचे काही तासांपूर्वी निधन झाले. यापूर्वी सर्वात धाकटा भाऊ अस्लम यांचे निधन झाले होते. आपण देवाकडून आलो आहोत आणि त्याच्याकडे परत जातो. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशा आशयाची पोस्ट दिलीपकुमार यांच्या वतीने ट्विटरवर करण्यात आली आहे.









