हिराबाई पेडणेकर 1903 मध्ये लिहिलेले गोव्यात रंगभूमीही होतेय आता ‘अनलॉक’
शैलेश तिवरेकर/ पणजी
गोमंतकातील पहिल्या मराठी नाटय़लेखका हिराबाई पेडणेकर यांनी 116 वर्षापूर्वी लिहिलेले जयद्रथ विडंबन हे नाटक आता प्रथमच रंगमंचावर येत आहे. गोव्यातील जेष्ठ नाटय़ दिग्दर्शक विजयकुमार नाईक यांच्या विजयकुमारर्स टॅव्हलिंग बॉक्स थिएटर यांच्यातर्फे हे नाटक गुरुवार 24 डिसेंबर रोजी फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिराच्या नाटय़गृहात सादर करण्यात येणार आहे.

गेल्या कित्येक महिन्यापासून कोविड19च्या महासंकटामुळे सगळेच सांस्कृतिक कार्यक्रम बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे या नाटकाद्वारे लॉक झालेले थिएटर आता अनलॉक होत आहे.

जयद्रथ दौपदीला पळवून नेण्याचा प्रयत्न करतो, या पौराणिक कथानकावर आधारलेले आणि 116 वर्षे दुर्लक्षित राहिलेले हे नाटक ज्येष्ठ नाटय़दिग्दर्शक, नाटय़लेखक विजयकुमार नाईक यांच्या अथक प्रयत्नांतून आता साकार होणार आहे.
सतराव्या वर्षी लिहिले होते नाटक
आद्य मराठी स्त्री नाटककार हिराबाई पेडणेकर यांनी तीन नाटके लिहिली होती. स्त्री म्हणून आणि तसेच सामाजिक प्रतिष्ठीतांच्या दृष्टीने त्या मागास समाजातील असल्याने त्यांचे लेखन उपेक्षित ठेवण्यात आले. वयाच्या सतऱयाव्या वर्षी 1903 त्यांनी जयद्रथ विडंबन हे नाटक लिहिले. 1904 साली ते पुस्तक स्वरूपात प्रकाशितही करण्यात आले होते. मात्र रंगमंचावर ते आलेच नव्हते. 116 वर्षे मंचित न झालेले हे नाटक आता रंगमंचावर येत आहे.
विजयकुमार नाईक यांचे दिग्दर्शन
या नाटकाचे दिग्दर्शन करणारे विजयकुमार नाईक हे गोव्यातील जेष्ठ श्रेष्ठ नाटकार आहेत. किंबहुना नाटय़क्षेत्रातील ते एक वेगळेच रसायन आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांनी आत्तापर्यंत अनेक नाटके दिग्दर्शित केली असून कित्येक युवा नाटय़कलाकार त्यांनी घडविले आहेत. दरवेळी नाटय़ क्षेत्रात काहीतरी नवीन करावे असा त्यांच्या ध्यास असतो. पालशेतीची विहिर हे नाटक त्यांनीच रंगमंचावर आणून गोवा तसेच इतर राज्यातही चांगला नावलौकिक मिळविला आहे. देश तसेच विदेशातील नाटय़महोत्सवात त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके चांगलीच गाजली आहेत.
अजय नाईक यांचे संगीत नियोजन
संगीत जयद्रथ विडंबन या नाटकातील काव्याला अजय नाईक यांनी स्वरबध्द केले आहे. त्यांना ऑर्गनवर समीर परब तर रुद्राक्ष वझे हे तबल्यावर साथ करणार आहेत. नेपथ्य अजय फोंडेकर, प्रकाश योजना मार्क फर्नांडिस, वेशभूषा अनिकेत नाईक, रंगभूषा चारुदत्त फडते यांनी बाजू सांभाळल्या आहेत. निर्माता व्यवस्थापन तेजस उर्फ बिकू खेडेकर सांभाळत असून त्यांना विराज नाईक व सिध्दांत खेंडेकर व विशाल गावडे सहाय्य करीत आहेत.
फोंडय़ात 24 रोजी होतोय पहिला प्रयोग
या नाटकात केदार मेस्त्री, शिवराज मळीक, पुरुषोत्तम म्हार्दोळकर, धिरज नाईक, आदर्श गोवेकर, रोहित सतरकर, दिव्या गावस, व तस्लीमा मयेकर हे युवा कलाकार अभिनय करीत आहेत. नाटकाचा पहिला प्रयोग 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता फोंडा गोवा येथील राजीव कलामंदिराच्या खुल्या नाटय़गृहात होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे उपस्थित रहाणार आहेत.
केवळ 100 नाटय़रसिकांना मिळणार प्रवेश
या प्रयोगास उपस्थित राहण्यासाठी मास्क व सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. फक्त 100 प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.









