आज पासष्ट एकर जमीन जिथे आहे तिथेच मेन रोडवर स्टेशन होते
By : चैतन्य उत्पात
पंढरपूर : आषाढी वारी बरोबरच करोडो भाविकांना श्री विठ्ठलाशी नाळ जोडून देणारा पंढरपूर येथील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पूल सुमारे 115 वर्षापासून आजही भक्कम स्थितीत आहे. विशेष म्हणजे नॅरोगेजसाठी बांधलेला हा पूल ब्रॉडगेज रुळांचाही भार पेलत आहे.
1915 साली बार्शी लाईट कंपनीने वालचंदनगर येथील फाटक, वालचंद कन्स्ट्रक्शन कंपनीला हा पूल बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. दीड वर्षात या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. पंढरपूरचे रेल्वे स्टेशन त्याआधी नदीपलीकडे शेगाव दुमाला येथे होते. आज पासष्ट एकर जमीन जिथे आहे तिथेच मेन रोडवर स्टेशन होते.
तेव्हा बाजूच्या रस्त्याने वारकरी गावात जाताना टॅक्स द्यावा लागत असे. मात्र, रेल्वेला एका दानशूर महिला भाविकाने पूल बांधण्यास मोठी आर्थिक मदत केल्याने पुढे हा टॅक्स रद्द करण्यात आला. हा पूल बांधण्यासाठी लखनौ येथील लोक आले होते. सर्वात हार्ड ग्रॅनाईट असणाऱ्या काळा पाषाण बांधकामासाठी वापरला आहे.
एकूण 25 कमानी असून प्रत्येक खांबासाठी 40 फूट खोल नदीत पाया काढून बळकटीकरणासाठी शिसे ओतले आहे. त्यावेळी भारताचे गव्हर्नर जनरल वेलिंग्टन हे होते, म्हणून पुलास वेलिंग्टन पूल असे नाव देण्यात आले. पंढरपूरचा ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पूल सव्वा किलोमीटरचा असून या पुलावरून रेल्वे पंढरीत शिरताना, लाखो भाविक पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष करीतच सुरूवात करतात आणि आषाढी वारीची प्रचंड गर्दी विठुरायाच्या नगरीत विसावते.








