2 मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविणार केसीआर
वृत्तसंस्था/ हैदराबाद
भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सोमवारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या 115 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 7 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर मुख्यमंत्री केसीआर हे गजेवल आणि कामारे•ाr या दोन मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणूक लढविणार आहेत.
16 ऑक्टोबर रोजी वारंगलमध्ये आमच्या पक्षाचे घोषणापत्र आम्ही जारी करणार आहोत. पक्षविरोधी कारवायांमध्ये भाग घेणाऱ्या नेते-कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री केसीआर यांनी आगामी निवडणुकीत 95-105 जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे. राज्याचे मंत्री अन् मुख्यमंत्री केसीआर यांचे पुत्र केटीआर हे सिरसिला मतदारसंघात पक्षाचे उमेदवार असणार आहेत. तेलंगणाच्या 119 सदस्यीय विधानसभेसाठी चालू वर्षाच्या अखेरीस निवडणूक होणार आहे.
बीआरएसने निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांची यादी जारी केली आहे. एआयएमआयएम या पक्षासोबत आमची मैत्री जारी राहणार असल्याचे सांगत केसीआर यांनी आगामी तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.
बीआरएसकडून जारी करण्यात आलेल्या यादीनुसार सिरपूर मतदारसंघात कोनेरू कोनप्पा, चेन्नूर मतदारसंघात (अनुसूचित जातीसाठी राखीव) बाल्का सुमन यांना उमेदवारी मिळाली आहे. बेल्लमपल्ली (अनुसूचित जातीसाठी राखीव) मतदारसंघामध्sय दुर्गम चिन्नैया, मंचेरिल येथे नदीपेल्ली दिवाकर राव, आसिफाबाद (अनुसूचित जमातीसाठी राखीव) मतदारसंघात कोवा लक्ष्मी यांना तिकीट देण्यात आले आहे.
बीआरएसने उमेदवारांची यादी जाहीर करत भाजप तसेच काँग्रेसवर निवडणुकीत आघाडी मिळविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केसीआर यांना 10 वर्षांच्या सत्ताविरोधी भावनेला सामोरे लागणार असल्याचे मानले जात आहे. याचमुळे त्यांच्या सरकारने मागील काही काळात अनेक नव्या योजनांची घोषणा केल्या आहेत.









