शोकात बदलला आनंदसोहळा
वृत्तसंस्था/ बगदाद
उत्तर इराकमध्ये मंगळवारी संध्याकाळी उशिरा एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे विवाहसोहळ्यासाठी शेकडो लोक एकत्र आले असताना आग लागली आहे. ख्रिश्चन धर्मीयांच्या विवाहसोहळ्यावेळी एका हॉलमध्ये आग लागल्याने 100 हून अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत. तर 150 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीची दुर्घटना इराकच्या निनवे प्रांतातील हमदानिया भागात घडली आहे. हमदानिया हे मोसूलपासून काही अंतरावर आहे.

हमदानिया हा ख्रिश्चनबहुल भाग असून बगदादपासून 335 किलोमीटर अंतरावर आहे. विवाहाच्या हॉलला आगीच्या ज्वाळांनी चहुबाजूने वेढले होते, यामुळे लोकांना तेथून बाहेर पडता आले नाही. दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक जखमींना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. जखमींसाठी आणखी ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्यात येत आहे. मृतांची संख्या 114 झाल्याचे निनवे प्रांताच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
या दु:खद घटनेतील पीडितांना मदत पोहोचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अनेक जखमींना क्षेत्रीय रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. बळींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे निनवे प्रांताचे गव्हर्नर नजीम अल-जुबौरी यांनी सांगितले आहे.
आग लागण्यामागील कारण अद्याप स्पष्ट नाही, परंतु सोहळ्याच्या स्थळी करण्यात आलेल्या आतिषबाजीमुळे ही दुर्घटना घडली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विवाहसोहळ्याच्या स्थळी सजावटीकरता अत्यंत ज्वलनशील सामग्रीचा वापर झाला होता. दुर्घटनेवेळी हॉलमध्ये हजाराच्या आसपास लोक उपस्थित होते.









