कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
रात्री आणि दिवसाही भरधाव, बेदरकारपणे चालवली जाणारी वाहने वन्यजीवांना धोकादायक ठरत आहेत. रस्ते अपघाता पाठोपाठ विद्युत प्रवाह वन्यप्राण्यासाठी काळ ठरत आहेत. या दोन्ही कारणांमुळे 2024 या वर्षात 26 प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे.तर वनविभागाच्या शीघ्र प्रतिसाद पथकाने 1135 वन्यजीवांना वाचवण्यात यश मिळवले आहे.
वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे.यामुळे जंगले विरळ होऊन पर्यावरणातील घटकांना हानी पोहोचत आहे.पर्यावरणातील अन्नसाखळीच नष्ट होऊ लागली आहे.वनांमध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे वन्यजीव मानवी वस्तीत घुसू लागले आहेत.पण मानवी वस्तीतील वावर प्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहे.वनविभागाच्या शीघ्र प्रतिसाद पथकाने 2024 या वर्षात केलेल्या वन्यजीवांच्या सुटकेवरुन हा धोका स्पष्ट होतो आहे.
शाहूवाडी तालुक्यातील थेरगाव येथे तसेच पन्हाळा तालुक्यात बिबट्याची बछडी सापडली होती. या बछड्यांचे पुन्हा आईबरोबर पुनर्मिलन घडवून आणण्यत यश मिळवले. टोप संभापूर जवळील मौजे तासगाव येथे दोन बिबट्यांनी मानवी घुसून गायीवर हल्ला केला होता. यामुळे मौजे तासगावमध्ये भीतीचे वातावरण होते. या बिबट्यांना सापळयात पकडून सुरक्षितपणे त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले.
वर्षभरात जवळपास 23 गव्यांची सुटका करण्यात आली आहे. काही गवे विहीरीत पडले होते. विहीरीतून वर येता येत नसल्यामुळे शीघ्र प्रतिसाद पथकाने त्या गव्यांना सुरक्षितपणे बाहेर काढून सुटका केली. तसेच काही गवे जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार करुन पुन्हा त्यांना जंगलात सोडण्यात आले.
वन्यजीवांमध्ये सद्या माकडांची संख्या प्रचंड वाढली आहे. जंगलाबरोबर मानवी वस्तीत माकडांचा वावर आहे. पण मानवी वस्तीत वावरणे माकडांना अपायकारक ठरत आहे. वीजेचा शॉक लागून तसेच वाहनांच्या धडकेत माकडांना इजा होण्याचे प्रमाण मोठे आहे. वर्षभरात 114 माकडांची सुटका करुन त्यांना अधिवासात सेंडण्यात यश मिळवले आहे.
- शीघ्र प्रतिसाद पथकाने सुटका केलेले वन्यजीव
बिबट्या– 4
गवे– 23
माकड– 114
पक्षी- 87
कोल्हा – 27
मगर– 17
हरीण– 6
साप– 816
कासव– 25
खवले मांजर– 3
घोरपड– 7
साळिंदर– 6
एकूण – 1135
- विविध कारणांमुळे मृत्यू झालेले वन्यजीव
माकडे-27, कोल्हे -09, रानमांजरे -9, पक्षी -31, अजगर -1
- वन्यजीव बचाव कार्य महत्वाचे
वन्यजीवांचा माणसांना आणि वन्यजीवांना माणसांचा त्रास होऊ नये यासाठी वनविभागाचे शीघ्र प्रतिसाद पथक कार्यरत आहे.वन्यजीव मानवी वस्तीत घुसून उपद्रवी ठरु शकतात.तसेच वन्यजीवांनाही धोका पोहोचू शकतो. अशावेळी शीघ्र प्रतिसाद पथक त्याठिकाणी पोहोचून वन्यजीवांना पकडून त्यांच्या अधिवासात सोडण्याचे काम करते. त्याप्रमाणे 2024 या वर्षात पथकाने 1135 वन्यजीवांची सुटका करुन त्यांच्या अधिवासात सोडले आहे.
प्रदीप सुतार–शीघ्र प्रतिसाद पथक प्रमुख








