330 जणांचा मृत्यू: राज्य आपत्ती घोषित : 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान
वृत्तसंस्था/ शिमला
हिमाचल प्रदेशमध्ये मागील एक आठवड्यापासून अतिवृष्टी होत आहे. चालू वर्षातील पावसाळ्यात 55 दिवसांमध्ये राज्यात भूस्खलनाच्या 113 घटना घडल्या आहेत. अतिवृष्टी आणि भूस्खलनाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत 330 जणांना जीव गमवावा लागला आहे. याचदरम्यान राज्य सरकारने शुक्रवारी राज्य आपत्ती घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी यासंबंधी अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

राज्य आपत्ती घोषित करण्यात आल्याने राज्यात मदत तसेच बचावकार्याला वेग येणार आहे. सरकार अधिक लक्ष देऊन नुकसान झालेल्या भागात पुन्हा पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने काम करणार आहे. याकरता सरकारला अतिरिक्त निधीचीही तरतूद करावी लागणार आहे. हिमाचल सरकार आता राज्यात झालेल्या नुकसानीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा करत आहे.
छत्तीसगड सरकारने हिमाचल प्रदेशला 11 कोटी रुपयांचा मदतनिधी देण्याची घोषणा केली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनुसार हिमाचलमध्ये चालू वर्षात पावसामुळे 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्याची राजधानी शिमल्यासमवेत अनेक जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत.
बचावकार्य पूर्ण क्षमतेने सुरू असून राज्य सरकार स्वत:च्या साधनसामग्रीद्वारे प्रभावित कुटुंबांना मदत करत आहे. केंद्रीय पथकांनी नुकसानीच्या आकलनासाठी प्रभावित क्षेत्रांची पाहणी केली आहे. आम्हाला केंद्राकडून तातडीने मदतीची गरज असल्याचे उद्गार मुख्यमंत्री सुक्खू यांनी काढले आहेत. राज्यात आतापर्यंत 11,301 घरांचे नुकसान झाले आहे. राज्यातील एकूण 506 मार्ग अद्याप बंद आहेत. तर 408 ट्रान्सफॉर्मर आणि 149 पाणीपुरवठा प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. तसेच हजारो लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागले आहे.

17,120 ठिकाणी भूस्खलनाचा धोका
हिमाचल प्रदेशात भूस्खलन होण्याचा धोका असलेल्या ठिकाणांची संख्या वाढून 17,120 झाली आहे. यातील 675 ठिकाणांच्या काठावर मानवी वस्ती आहे. शिमला येथील अनेक शासकीय इमारती देखील भूस्खलनाच्या धोक्याला तोंड देत आहेत. हिमाचलमध्ये 68 भुयारीमार्ग तयार केले जात आहेत, यातील 11 भुयारीमार्ग तयार झाले असून 27 निर्माणाधीन असून 30 विस्तृत प्रकल्पांचा अहवाल तयार केला जात आहे. यातील अनेक प्रकल्प केंद्र सरकारचे आहेत. यामुळे राज्यात भूस्खलनाची जोखीम असणारी ठिकाणं वाढणार आहेत.
हिमाचलच्या पर्वतांना नुकसान पोहोचण्याची कारणे…
अशास्त्राrय पद्धतीने निर्मितीकार्ये, पर्वतीय क्षेत्रात खनन कार्य करत बांधकामे.
पाण्याचे मार्ग अडल्याने पाण्याचा साठा होत पर्वतांमध्ये भूस्खलनाच्या घटना
अतिक्रमण तसेच पाण्याच्या मार्गात बांधकामे झाल्याने निचऱ्यात अडथळा









