प्रतिनिधी / सातारा :
राज्यभरातील 113 नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्हय़ातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी येथील नगरपंचायतींचा समावेश आहे. त्यावर 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, 30 नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
मुदत संपलेल्या नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 1 नोव्हेंबर रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 26 नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. 29 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 30 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जातील, असे आयोगातर्फे सांगण्यात आले आहे.