आरोग्य खात्याकडून खबरदारी : 1534 जणांची तपासणी : नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यात डेंग्यूचा फैलाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य खात्याकडून खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये 1534 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 112 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यानुसार आरोग्य खात्याकडून जनजागृती करून रोग नियंत्रणासाठी उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती रोग नियंत्रण अधिकारी डॉ. एम. एस. पल्लेद यांनी दिली.
पावसाला सुरुवात झाल्याने रोगराई वाढीस लागते. नागरिकांना ताप, खोकला यासह हातपाय दुखणे असे आजार उद्भवतात. ही सर्व डेंग्यूची लक्षणे आहेत. अशा आजारांची दखल घेऊन आरोग्य खात्याकडून गावपातळीवर जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. डासांमुळे डेंग्यूचा फैलाव होतो. यासाठी डासांची पैदास रोखणे आवश्यक आहे. आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे, पावसाचे पाणी साठू न देणे, गावामध्ये ग्राम पंचायतीच्या माध्यमातून औषध फवारणी करणे, गटारी स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांना माहिती देणे, आदी माध्यमांतून जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. शाळा, तसेच गावागावात असणाऱ्या आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जात आहे. घरोघरी जावून साठविण्यात आलेल्या पाण्याची पाहणी करण्यात येत आहे. पाणी अधिक दिवस साठवून ठेवू नये, याची माहिती देण्यात येत आहे. तसेच गॅम्बुसिया आणि गप्पी मासे सोडण्यात येत आहेत, असे डॉ. पल्लेद यांनी सांगितले.
बेळगावमध्ये 22 रुग्ण
विशेषकरून पावसाळ्यात डेंग्यूचा फैलाव अधिक होतो. जिल्ह्यामध्ये रोगराई रोखण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. तपासणीत 112 जणांना डेंग्यू झाल्याचे आढळून आले आहे. बेळगाव 22, बैलहेंगल 20, खानापूर 20, चिकोडी 20, रायबाग 4, हुक्केरी 8, गोकाक 6, सौंदत्ती 5, यासह इतर तालुक्यांमध्ये किरकोळ प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.









