कोल्हापूर :
सीपीआर हॉस्पिटलसमोरील न्यायालयाच्या जुन्या इमारतीमध्ये कोल्हापूर सर्किट बेंचचे काम सोमवार, 18 ऑगस्टपासून सुरु होत आहे. सर्किट बेंचचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सर्किट बेंचच्या आवारात अत्याधुनिक 110 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. याचसोबत अत्याधुनिक अशी अग्निशमन यंत्रणाही बसवली आहे.
सर्किट बेंच परिसराच्या सुरक्षेसाठी सीपीआर परिसर नो व्हेईकल झोन किंवा शिवाजी चौकापर्यंत एकेरी वाहतूक करण्याचे नियोजन पोलीस प्रशासनाकडून सुरु आहे. याबाबतची चाचपणी शहर वाहतूक शाखेकडून सुरु आहे. यासोबत सीपीआर हॉस्पिटलच्या इन-आऊट गेटमध्येही बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सीपीआर ते भाऊसिंगजी रोडवर नेहमीच वर्दळ असते. सीपीआर, टाऊन हॉल, शाहू स्मारक, पंचायत समिती अशी कार्यालय परिसरात असल्यामुळे या मार्गावर वाहतुकीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सर्किट बेंचचे कामकाज विनाअडथळा सुरु रहावे, यासाठी या मार्गावर नो पार्किंग, नो व्हेईकल झोन किंवा एकेरी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत उच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
न्यायालयाच्या आवारात सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्याधुनिक असे 110 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये नाईट मोडसह कॅप्चरिंगसह साऊंड क्लिअॅरिटी सुविधाही असणार आहे. सोबत प्रत्येक इमारतीस स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा उभी केली आहे. न्यायालयाच्या आवाराजवळच पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वराजवळ मेटल डिटेक्टर बसवण्याची शक्यता आहे.
- दसरा चौकात पार्किंग
न्यायालयाच्या आवारामध्ये पार्किंग मर्यादित आहे. यामध्ये न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी आणि सरकारी वकील तसेच वकिलांची वाहने लागू शकतात. सहा जिह्यातून रोज हजारो पक्षकार न्यायालयात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने दसरा चौकातील पार्किंग सुसज्ज करणे, तालुका पंचायत समितीचे पार्किग सुरु करणे आवश्यक आहे.
- प्रत्येक इमारतीचा कंत्राटदार वेगळा
सीपीआर समोरील न्यायालयाच्या आवारात 4 इमारती आहेत. यामध्ये 2 हेरिटेज वास्तूंचा समावेश आहे. या चारही ठिकाणी कामासाठी वेगवेगळे कंत्राटदार नेमले आहेत. कमीत कमी वेळेमध्ये अधिक काम होण्यासाठी युद्धपातळीवर 750 कामगारांकडून 12 तासांचे काम सुरु आहे.
- ‘हेरिटेज’चा लुक कायम
राधाबाई इमारत आणि फॅमिली कोर्ट सुरु असलेली इमारत या दोन वास्तू हेरिटेजमध्ये येतात. त्यामुळे या दोन्ही वास्तूंच्या मूळ स्वरुपाला कोणत्याही स्वरुपाचा धक्का न लावता नूतनीकरण करण्यात येत आहे. या वास्तूंच्या दगडांवर असणारा वर्षानुवर्षाचा रंग काढला आहे. सागवानी लाकडास अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने रंगरंगोटी केली आहे.
- वनवेची शक्यता
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा मार्ग एकेरी वाहतुकीसाठी राखीव केला तर सीपीआर कडून शिवाजी पुतळ्याकडे वाहतूक जाण्यास मुभा असेल. शिवाजी चौकाकडून सीपीआरकडे येणारी वाहतूक माळकर तिकटीमार्गे मटण मार्केटकडून लक्ष्मीपुरीकडे वळवण्याचे नियोजन सध्या सुरु आहे. येत्या चार दिवसांमध्ये याबाबतचे आदेश निघण्याची शक्यता आहे.
- सीपीआरचे इन-आऊट गेट बदलण्याची शक्यता
सीपीआर समोरील रस्त्यावर उभ्या असणाऱ्या अॅम्ब्युलन्सचे पार्किंग बंद होणार आहे. यासोबत परिसरातील अजूनही असणारी अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. सीपीआरमध्ये येणाऱ्या वाहनांच्या मार्गात तसेच जाण्यासाठीच्या मार्गात आणि सीपीआरच्या इन आणि आऊट गेटमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.








