शैक्षणिक संस्था CCTV च्या निगराणीखाली, गळ्यावर व पायावर संशयास्पद व्रण
हातकणंगले : आळते (ता. हातकणंगले) येथील मदरसामध्ये 11 वर्षीय अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. फैजान नजीन (मूळ रा. बिहार. सध्या रा. आळते, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतची फिर्याद मुलाचा मामा साबीर अब्दुल शेख (रा. सुभाषनगर सिरत मोहल्ला, कोल्हापूर) यांनी हातकणंगले पोलिसात दिली आहे. नजीन याच्या गळ्यावर व पायावर संशयास्पद व्रण दिसत आहेत. त्यामुळे त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
आळते गावच्या हद्दीत मदरसा निजामियाँ नावाची धार्मिक शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था आहे. संपूर्ण शैक्षणिक संस्था सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असून संस्थेमध्ये राज्यातील व परराज्यातील जवळपास 70 ते 80 विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेत आहेत.
यातील बिहारचा विद्यार्थी फैजान नजीन नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून 10 ते 11 च्या दरम्यान इतर विद्यार्थ्यांसोबत झोपला. पहाटे पाच वाजता तो झोपेतून उठलाच नाही. त्याला तत्काळ उपचाराकरिता हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तो उपचारापूर्वी मृत झाल्याचे सांगितले.
त्यानंतर मृत फैजान याचा मृतदेह कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळी डीवायएसपी रोहिणी सोळंके यांनी भेट देऊन माहिती घेतली. दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ
हातकणंगले पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सरगर यांना घटनेची माहिती विचारण्यासाठी मोबाईलवरून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर ठाणे अंमलदार व संबंधित तपासी पोलीस कर्मचारी यांनीही माहिती देण्यास टाळाटाळ केली.








