वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तर भारतातील बहुतेक सर्व राज्यांमध्ये मान्सूनच्या पावसाची जोरदार वृष्टी होत असून या तडाख्यात 11 जणांचा बळी गेला आहे. विशेषत: हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीसारखी परिस्थिती असून 5 जणांचा बळी गेला आहे. दिल्लीत अतिसावधतेचा इशारा देण्यात आला असून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची रविवारची सुटी रद्द केली होती. त्यांना अनेक स्थानी स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा आदेश देण्यात आला होता.
दिल्लीत रविवारी विक्रमी पाऊस झाला. इतका पाऊस एका दिवसात गेल्या 35 वर्षांमध्ये पडला नव्हता, अशी माहिती देण्यात आली. यामुळे काही स्थानी वीजपुरवठा खंडीत झाला होता आणि मार्गांवर पाणीच पाणी झाले होते. दिल्लीच्या सखल भागात पाणी साठले असून त्याचा उपसा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्रीय साहाय्यता दलांना सज्ज राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

पंजाब-हरियाणातही जोरदार
पंजाब आणि हरियाणा या कमी पावसाच्या प्रदेशांमध्येही यंदा पावसाचा धुमाकूळ होत आहे. यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत असून प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल अंबाला 70 मिलीमीटर, सिरसा 50 मिलीलीटर, कर्नाळ 40 मिलीमीटर, कुरुक्षेत्र 30.5 मिलीमीटर, महेंद्रगढ 24 मिलीलीटर आणि रोहटक 12 मिलीमीटर असे पावसाचे प्रमाण आहे. तर पंजाबच्याही सात जिल्ह्यांमध्ये सरासरी 40 मिलीमीटर पाऊस पडला आहे.
राजस्थानात चार बळी
राजस्थानात गेल्या दोन दिवसांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून 4 जण मृत्युमुखी पडले आहेत. चितोडगढ जिल्ह्यात वीज पडल्याने एक महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर सवाई माधोपूर जिल्ह्यात दोन पुरुष वाहून गेल्याची घटना घडली आहे. पाली आणि जेसलमेर जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे 94 आणि 79.5 मिलीमीटर पाऊस झाला. अन्य किमान 15 जिल्ह्यांमध्ये पुढच्या 48 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून प्रशासन सज्ज होत आहे.

उत्तर प्रदेशातही वृष्टी
उत्तर प्रदेश या भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठ्या असणाऱ्या राज्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. वीज पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे अनधिकृत वृत्त आहे. पश्चिम उत्तर प्रदेश आणि मध्य उत्तर प्रदेशात चांगली वृष्टी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड भागातही यंदा चांगला पाऊस झाल्याची नोंद झाली.
बिहारमध्ये पूरस्थिती
बिहारमध्ये पूरस्थिती यंदा काहीशी लवकर आली आहे. राज्यातील पाच महत्वाच्या नद्यांमधींल पाणी वाढले असून त्या धोक्याच्या पातळीबाहेर लवकरच जातील अशी स्थिती आहे. नद्यांमधील पाणी वाढल्याने तटानजीकच्या अनेक खेड्यांना सावधतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या राज्यातही अनेक शहरांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. पर्जन्यमान विभागाच्या अनुमानानुसार पुढील चार दिवसांमध्ये राज्यभर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
गाठली 95 टक्के सरासरी
उत्तर भारतात दोन आठवड्यांपूर्वी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी होते. पण जूनअखेर आणि जुलैच्या प्रारंभी आतापर्यंतच्या दोन आठवड्यांमध्ये जवळपास 100 टक्के सरासरी गाठली गेली आहे. देशातही आता 9 जुलैपर्यंतच्या सरासरीच्या 90 टक्के पाऊस पडल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे बळीराजाला हायसे वाटले असून बराच काळ लांबलेली पेरणीची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत.
पुढचे चार दिवस महत्वाचे
ड उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढच्या चार दिवसांमध्ये पाऊस वाढणार
ड वीज कोसळल्यामुळे अनेक स्थानी माणसांचा मृत्यू, अनेक लोकांना जखमा
ड मध्यप्रदेश, झारखंड आणि छत्तीसगड राज्यांमध्येही पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी
ड दिल्लीत जुलैमध्ये काही दिवस शाळा बंद ठेवण्याचा राज्यप्रशासनाचा आदेश









