मृतांमध्ये 2 मुले, 5 महिलां समावेश ः 12 हून अधिक जण अत्यवस्थ
वृत्तसंस्था/ लुधियाना
पंजाबमधील लुधियानामध्ये रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. एका दूध केंद्रामध्ये झालेल्या गॅस गळतीमुळे 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांसह 5 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. दगावलेली मुले 10 आणि 13 वर्षांची आहेत. शहरातील ग्यासपुरा इंडस्ट्रियल एरियाजवळील एका इमारतीत बांधलेल्या दूध केंद्रामध्ये सकाळी 7.15 वाजता हा अपघात झाला. गॅस गळतीमुळे 12 लोक बेशुद्ध पडलेले असून त्यांच्यावर नजिकच्या इस्पितळात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. तसेच कोणत्या गॅसची गळती झाली आणि त्याचे कारण काय, याबाबतचा तपास सुरू आहे.
ग्यासपुरा परिसरात घडलेल्या विषारी वायूच्या गळतीची माहिती मिळताच पोलीस, मेडिकल, फायर ब्रिगेड, एनडीआरएफ आणि प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. एनडीआरएफची टीम मास्क घालून इमारतीपर्यंत पोहोचली होती. तर अग्निशमन विभागाच्या मदतीने बेशुद्ध झालेल्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून एक किलोमीटपर्यंतचा परिसर सील केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दुर्घटना घडलेल्या इमारतीत दुधाचे केंद्र होते सकाळी दूध खरेदीसाठी गेलेले नागरिक बेशुद्ध झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. वायू गळती झालेल्या इमारतीच्या 300 मीटरच्या क्षेत्रातील लोकांना या गॅस गळतीचा फटका बसला. प्रशासनाने इमारतीभोवतीचा एक किलोमीटरचा परिसर सील केल्याची माहिती स्थानिक आमदार राजिंदरपाल कौर यांनी दिली.
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकार प्रत्येकी 2 लाख रुपये देणार आहे. तसेच अत्यवस्थ असल्याने इस्पितळात दाखल असलेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये दिले जातील. या लोकांच्या उपचाराचा खर्चही सरकार उचलणार असल्याचे लुधियानाच्या जिल्हाधिकारी सुरभी मलिक यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून दखल
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही लुधियानाच्या ग्यासपुरा इथल्या गॅस गळतीच्या घटनेची दखल घेतली आहे. लुधियानाच्या ग्यासपुरा भागातील कारखान्यातून गॅस गळतीची घटना अत्यंत दुःखद आहे. पोलीस, सरकार आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी हजर आहे. बाधितांना सरकारच्यावतीने शक्मय ती सर्व मदत केली जाईल, असे ट्विट मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केले आहे.
मृतांची ओळख
मृतांमध्ये सौरव गोयल (35), प्रीती गोयल (31), कमलेश गोयल (60) आणि डॉ. कविलाश (40), त्यांची पत्नी वर्षा (35), मुलगी कल्पना (16) आणि दोन मुले अभय नारायण (13) आणि आर्यन नारायण (10) यांचा समावेश आहे. नवनीत कुमार (39) आणि नीतू देवी (39) यांचाही मृत्यू झाला असून सायंकाळपर्यंत अन्य एकाची ओळख पटलेली नाही. याशिवाय एकूण 12 जण रुग्णालयात दाखल आहेत. यातील गौरव गोयल (50) आणि नितीन (40) यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर राजेश कुमार (28) आणि रुबी देवी (29) यांच्यावर ओसवाल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
आजूबाजूच्या घरातील लोक बेशुद्ध
घटना घडलेल्या इमारतीतून सर्व लोकांना बाहेर काढण्यात आल्याचे लुधियानाचे पोलीस आयुक्त मनदीप सिद्धू यांनी सांगितले. मात्र, निवासी भागात बांधलेल्या या इमारतीच्या 300 मीटर परिसरात अनेक लोक बेशुद्धावस्थेत सापडले आहेत. आजूबाजूची घरे आणि रहिवासी क्षेत्रातील लोकही बेशुद्ध झाले आहेत. प्रशासनाने ड्रोनच्या मदतीने आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली.
युद्धपातळीवर तपास
या परिसरात कोणत्या गॅसची गळती झाली आणि त्याचे कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, प्राथमिक तपासणीत गॅसचा वास सीवरेजच्या गॅससारखा असल्याचे निष्पन्न झाले आहे. आता गॅस तपासण्यासाठी मशिन मागवण्यात आल्या आहेत. गटारातील ऍसिडमुळे हा प्रकार घडू शकतो किंवा आत काही केमिकल असणे हे या गॅसचे कारण असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. चौकशीनंतरच निश्चित कारण स्पष्ट होईल, असे पोलीस आयुक्त मनदीप सिद्धू यांनी सांगितले.









