हिमाचलमधील घटना ः सर्वांची सुरक्षितपणे सुटका
@ शिमला / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेशातील सोलन जिह्यातील परवानू येथे टिंबर टेल रोपवेमध्ये (केबल कार) 11 पर्यटक ऐन मध्यभागी अडकल्याची घटना सोमवारी घडली. तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्यानंतर तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नांती दोरीच्या साहाय्याने सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. पाच तासांहून अधिक वेळ ट्रॉली हवेत अडकली होती. सोलन जिल्हा प्रशासन आणि टिंबर टेलच्या तांत्रिक कर्मचाऱयांच्या मदतीने अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात आली. यादरम्यान एनडीआरएफच्या टीमचीही मोठी मदत लाभल्याचे सांगण्यात आले. याचदरम्यान बचावकार्यामुळे शिमला-चंदिगढ राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूंनी बराच वेळ वाहनांची कोंडी झाली होती.
राज्याचे प्रवेशद्वार असलेल्या परवानू येथे सुमारे 800 मीटर अंतरावर एका टेकडीवर टिंबर टेल रिसॉर्ट आहे. येथे रोपवेने लोक हॉटेलपर्यंत पोहोचतात. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ट्रॉलीमध्ये तांत्रिक बिघाड झाला. तेव्हापासून ट्रॉली हवेत लटकली. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व लोकांना दोरीच्या साहाय्याने वाचवण्यात आले. काही लोक दोरीवरून खाली उतरायला घाबरत असल्यामुळे त्यांची सुटका करणे आव्हानात्मक बनले होते.
बचाव कार्यादरम्यान रोपवेजवळ मोठय़ा प्रमाणात लोक जमा झाले. ट्रॉली जमिनीपासून 120 मीटरपेक्षा जास्त उंचीवर हवेत लटकत असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी स्वतः मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी सर्व लोकांना लवकर बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या. ट्रॉलीतून बाहेर काढलेले लोक खूपच घाबरल्याचे दिसून येत होते. बचावकार्यादरम्यान ट्रॉलीमध्ये अडकलेल्या पर्यटकांचे मनोबल वाढवण्यात प्रशासन गुंतले होते. बचावकार्यानंतर बाहेर काढण्यात आलेल्या लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सुरक्षित बचावासाठी जिल्हा प्रशासनाने लष्कराची मदत घेतली.
हॉटेलमधून परतणारे पर्यटक
ट्रॉलीमध्ये अडकलेले सर्व लोक टिंबर टेल रिसॉर्टमधून परतत होते. यादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे ट्रॉली मध्येच हवेत अडकली. अडकलेल्या एकूण 11 जणांपैकी काहीजण वयोवृद्धही होते. ज्येष्ठ लोकांना दोरीवरून खाली उतरणे अवघड झाल्यामुळे बचाव मोहीम लांबत गेली. पाच तासांहून अधिक काळ ट्रॉली हवेत लटकत होती. ट्रॉलीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हवाई दल आणि एनडीआरएफला पाचारण करण्यात आल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष सचिव सुदेशकुमार मोक्ता यांनी सांगितले. ट्रॉलीमध्ये अडकलेले लोक मदतीचे आवाहन करत असल्यामुळे अखेर बचावासाठी एनडीआरएफ टीमला पाचारण करण्यात आले. त्याचवेळी तांत्रिक बिघाडामुळे हवेत अडकलेली ट्रॉली दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक पथकही पोहोचले होते.
30 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या
यापूर्वीही ऑक्टोबर 1992 मध्ये कालका-शिमला राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टिंबर टेलमध्ये 11 पर्यटक अडकले होते. त्यांच्यामध्ये एक बालकही होते. त्यादरम्यान ट्रॉली अटेंडंट गुलाम हुसैन यांनी जीव वाचवण्यासाठी उडी मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.









